मुंबई,दि.02(वृत्तसंस्था)ः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला पाठिंबा दिला असून, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला विरोध केला जात आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी लागू होऊ देणार नाही. अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्रासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. तेव्हा ते मुलाखतीत म्हणाले की,“सीएएमुळे देशातील कोणत्याही नागरिकाची नागरिकता हिसकावून घेतली जाणार नाही. मात्र, एनआरसी महाराष्ट्रात लागू होऊ दिले जाणार नाही. जर एनआरसी लागू झाले तर हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील लोकांना नागरिकता सिद्ध करणे कठीण होऊन बसेल. त्यामुळे मी असं होऊ देणार नाही.”
उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीतून हिंदुत्वाचा नारा पुन्हा एकदा बुलंद केला. हिंदुत्वाच्या विचारधारेशी आम्ही कुठलीही तडजोड केलेली नाही.” ही मुलाखत येत्या काही दिवसांमध्ये प्रकाशित होणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे ज्या राज्यांमध्ये सीएएविरोधात ठराव मांडण्यात आला आणि तो मंजूर करण्यात आला. ती राज्ये बिगर भाजपाशासित राज्ये आहेत. असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.





