गोंदिया : सध्या इंटरनेटचा वापर प्रत्येक कामकाजात आवश्यक झाला आहे. शासकीय कार्यालयासह सर्वांनाच आता ऑनलाईन कामकाजामुळे इंटरनेट सुविधा असणे आणि ती विना व्यत्यय सुरु राहणे हे गरजेचे झाले आहे. त्यासाठी शासनाने शहरी महानेट प्रकल्प सुरु केला असून या शहरी महानेट प्रकल्पाचा शुभारंभ आज 11 फेब्रुवारी 2020 रोजी नविन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांच्या हस्ते करण्यात आला.
तहसिलदार अनिल खडतकर, नगरपरिषद मुख्याधिकारी चंदन पाटील, विद्युत महावितरण विभागाचे अधीक्षक अभियंता ओ.के.बारापात्रे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आनंद जैन व अधीक्षक गणेश तिरपुडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक एच.जी.पौनीकर, महा आयटी सेल समुह, सीएससी जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक मयुर टप्पे, रिलायन्स जिओचे अभियंता अनिकेत राखुंडे व संतोष लिल्हारे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक एच.जी.पौनीकर यांनी योजनेची माहिती, फायदे तसेच सामान्यासाठी होणाऱ्या लाभाची विस्तृत माहिती दिली. शासकीय कार्यालय, शाळा वसतिगृहे यांना अल्प दरात जोडणी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी दुर्गम भागातील तालुक्याला देखील याचा लाभ मिळणार असल्याचे समाधान व्यक्त केले.
या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील महत्वाचे शासकीय विभाग त्यांच्या अखत्यारित असलेले 279 शासकीय कार्यालये, शाळा, शासकीय विभाग इत्यादी ठिकाणी एकमेकांना जोडली जाणार आहेत. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या फायबर ऑप्टीक इंटरनेट सुविधेअंतर्गत त्या त्या ठिकाणांना उच्च गतीने सेवा देण्यात येणार आहे. सदर उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील शासकीय कार्यालयामध्ये ई-गव्हर्नस आरोग्य शिक्षण ई-डेटा आदी उपक्रमांना गती देवून त्यांचा दर्जा सुधारणार आहे. नागरिकांना मिळणाऱ्या दाखल्यांचे कामकाजही गतीशील होणार असल्याने समस्या निकाली निघणार आहे.इंटरनेटचा वापर हा आता अनिवार्य असल्याने या शहरी महानेट प्रकल्पाचा लाभ पहिल्या टप्प्यात शासकीय कार्यालयांना होणार आहे. नंतर शासकीय शाळा व इतर आस्थापनात ही महानेट सेवा सुरु होणार आहे. या प्रकल्पामुळे इंटरनेट सेवेची गती वाढणार असून यामुळे शासकीय कार्यालयातील कामकाजाला गती मिळणार आहे. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.





