33.1 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home गुन्हेवार्ता ट्रकने चिरडल्याने कामगाराचा मृत्यू,संतप्त जमावाने ट्रकला पेटविले

ट्रकने चिरडल्याने कामगाराचा मृत्यू,संतप्त जमावाने ट्रकला पेटविले

0
33

अमरावती,दि.11ः-रेतीची वाहतूक करणार्‍या ट्रकने एका कामगाराला चिरडल्याची घटना आज दुपारी तीन वाजता च्या सुमारास अमरावतीच्या जुना बायपास मार्गावरील चपराशीपुरा येथे घडली. या अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकला पेटविले. मनोज मुलचंद नायकवाड (वय 40, रा. परिहरपुरा) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मनोज नायकवाड हा परिसरातीलच एका मद्य विक्रीच्या दुकानात कामगार म्हणून काम करीत होता. दुपारी तीन वाजताचे सुमारास जेवणासाठी तो त्याच्या सायकलने घरी निघाला होता. रस्ता ओलांडत असताना बडनेरा दिशेने जाणाऱ्या ट्रकने त्याला चिरडले. मनोज हा ट्रकच्या समोरील चाकात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. सुरुवातीला संतप्त नागरिकांनी ट्रकच्या काचा फोडून संताप व्यक्त केला. यानंतर नागरिकांनी ट्रकला पेटविले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच जमावाला नियंत्रणात आणण्यात आले. यासाठी पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केला. महापालिकेचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. पेटत्या ट्रक वर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यात आली. अपघात व संतप्त जमावाचा उद्रेक यामुळे जुन्या बायपास महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.