भंडारा,दि.12ः शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधाकर चव्हाण व साकोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक बंडोपंत बनसोडे यांना कर्तव्यात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत विशेष पोलिस महानिरीक्षक नागपूर यांनी निलंबित केले आहे. निलंबनाचे आदेश सोमवारी संध्याकाळी पोहोचले.
काही दिवसांपूर्वी भंडारा येथील पत्रकार भवनाच्या इमारतीत तोडफोड प्रकरणात काही जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर पोलिस निरीक्षक सुधाकर चव्हाण यांनी दिरंगाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सोमवारी संध्याकाळी निलंबनाचे आदेश ठाणेदार सुधाकर चव्हाण यांना मिळाले.
साकोली येथे एक शाळकरी मुलगी बेपत्ता झाल्यानंतर ४0 दिवसानंतर तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाच्या तपासात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत साकोली पोलिस ठाण्याच्या दोन सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह एका पोलिस हवालदारावर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी यापूर्वीच निलंबनाची कारवाई केली आहे. आता याच प्रकरणात पोलिस निरीक्षक बंडोपंत बनसोडे यांच्यावरही तपासात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे.
१४ डिसेंबर २0१९ रोजी साकोलीतील एक विद्यार्थीनी शाळेत जाण्यासाठी निघाली. परंतु, ती शाळेत पोहोचली नाही. त्यानंतर घरीसुद्धा परतली नाही. याप्रकरणी तिच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्र ार केली. मात्र पोलिसांनी तिचा शोध घेण्यास विलंब केला. ४0 दिवसानंतर तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणात दिरंगाई केल्यामुळे साकोली पोलिस ठाण्याचे दोन सहाय्यक पोलिस निरीक्षक व एका हवालदाराला निलंबित करण्यात आले होते. आता याच प्रकरणात पोलिस निरीक्षक बंडोपंत बनसोडे यांनाही निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई विशेष पोलिस महानिरीक्षक नागपूर यांनी केली आहे. पोलिस अधिकारी व कर्मचार्यांच्या निलंबनाच्या कारवाईमुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे.




