गोंदिया,दि.13ःचित्रकलेच्या माध्यमातून बालकांच्या भावना व्यक्त करण्यासाठी तसेच कल्पनाशक्तीची ओळख करण्याचा योग्य मार्ग आहे. चित्रकलेच्या माध्यमातून बालकांच्या वेगवेगळ्या कल्पनांना चालना मिळते. चित्रकलेच्या माध्यमातून समाजोपयोगी नावीन्यपूर्ण संकल्पना उदयास येतात असे आमदार अग्रवाल यांनी संबोधित केले. ते सुभाष गार्डन गोंदिया येथे आयोजित चित्रकला स्पर्धेत बोलत होते. चित्रकलेच्या उदाहरणे देत त्यांनी अमेरिका येथील नायगारा फॉल बद्दलची माहिती दिली. अमेरिका येथील नायगारा फॉल हे एका खाजगी जागेवर होते. चित्रकारांनी नायगारा फॉल्स चे उत्तम असे चित्र काढून त्याची प्रदर्शनी अमेरिकेतल्या विविध शहरात प्रदर्शित केली. त्या प्रदर्शनामुळे अमेरिकेतील नागरिकांना एका सुंदरश्या धबधब्या बद्दलची माहिती मिळाली. ते नेमकी कुठे आहे याची उत्सुकता नागरिकात वाढू लागली. त्यावर लोकांनी शोध सुरू केल्यावर कळले की ते खाजगी आहे आणि तिथे जाण्यास मनाई आहे. यावर लोकांनी आंदोलने करून शासनाला ते धबधबा शासकीय करून नागरिकास उपलब्ध करून द्यायला भाग पाडले. एवढे सगळे फक्त एका चित्रकलेतून घडले. त्यामुळे चित्रकला हे समाजजागृतीचे एक उत्तम मार्ग ठरू शकते असे आमदार विनोद अग्रवाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते कार्यक्रमात प्रमुख अतिथी रूपाने उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी राजकुमार हिवरे,संचालक डॉ. पंकज कटकवार, डॉ. नीरज कटकवार इत्यादी मंडळी प्रमुख अतिथी रूपाने मंचावर उपस्थित होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रोग्रेसिव चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.





