35.6 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home विदर्भ शेती विकासासाठी साकोली येथे कृषी विद्यालय स्थापणार – नाना पटोले

शेती विकासासाठी साकोली येथे कृषी विद्यालय स्थापणार – नाना पटोले

0
44

साकोली,दि.14ः- पारंपरिक सोबतच शेतकर्‍यांना आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान व शिक्षण प्राप्त व्हावे आणि शेती क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी साकोली येथे कृषी विद्यालय स्थापन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.पशुसंवर्धन विभाग व पंचायत समिती साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने उमरी येथे आयोजित तालुकास्तरीय पशु पक्षी प्रदर्शन व पशु पालक मेळाव्यात ते बोलत होते.
सभापती रेखा वासनिक, साकोली पंचायत समिती सभापती उषा डोंगरवार, जि. प. सदस्य अशोक कापगते, दीपक मेंढे, मंदाताई गणवीर, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. नितीन फुके, तहसीलदार बाळासाहेब टेळे, विभागीय कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, गट विकास अधिकारी सुनील तडस, पंचायत समिती सदस्य जनार्धन डोंगरवार, लालचंद लोथे, जयश्री पर्वते, उमरीचे सरपंच लेखराम लांजेवार, पशुधन विकास अधिकारी डॉ. सविता वाढई, प्रभारी गट विकास अधिकारी आर. व्ही. मेर्शाम व आर. एस. मेर्शाम उपस्थित होते.
पुढे बोलताना पटोले म्हणाले, शेती व्यवसायिक दृष्टिकोनातून करणे गरजेचे आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन व्यावसायिकता जोपासल्यास आर्थिक उत्पन्न हमखास वाढेल. बारमाही शेती हा प्रयोग अंगीकारावा. त्याचप्रमाणे प्रत्येक विभागने क्षेत्रनिहाय विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. शेतीचा खर्च वाढला व पशुधनाची किंमत सुद्धा वाढली. त्यामुळे दुधाचे भाव वाढले पाहिजे. यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. शेतकर्‍यांनी शेती सोबतच जोडधंदा करावा असे आवाहन त्यांनी केले. व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी प्रत्येक गावातील गरिबांचा गाव निहाय कुटुंबनिहाय माहिती असलेली यादी तयार करावी असे त्यांनी प्रशासनाला सांगितले.
प्रस्ताविक डॉ. नरेश कापगते यांनी केले. प्रदर्शनीसाठी निधी वाढवून मिळावा ही विभागाची मागणी होती. भंडारा जिल्हा नियोजन समितीने यासाठी चार लाखांच्या निधीची तरतूद ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले. हा निधी लवकर प्राप्त व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील गाय म्हैस यांना ओळख क्रमांक देण्याची मोहिम पुढील महिन्यापासून राबविण्यात येणार असून भंडारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी या मोहिमेत सहभागी होऊन सर्व पशु पालकांनी आपल्या पशूला ओळख क्रमांक बिल्ला लावून घ्यावा, असे आवाहन डॉ. नितीन फुके यांनी केले.
सहभागी गोपालकांना म्हैस वर्ग, बैल जोडी गट, शेळी मेंढी गट, कुक्कुट पक्षी गट व प्रोत्साहनपर बक्षिस नाना पटोले यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. प्रदर्शनी मध्ये विविध विभागचे स्टॉल लावण्यात आले होते. या सर्व स्टॉलला भेट देऊन नाना पटोले यांनी पाहणी केली. या प्रदर्शनित विविध जातीच्या गाई, म्हशी, बैल, बकरी, कोंबड्या, बचत गटांचे स्टॉल लावण्यात आले होते.
जि. प. सदस्य अशोक कापगते यांचे यावेळी भाषण झाले. दुधाचा भाव वाढवावा, पूल बांधावा, उमरी येथे पावर स्टेशन व्हावे अशी मागणी त्यांनी केली. सभापती उषा डोंगरवार, जयश्री पर्वते व रेखा वासनिक यांनी मनोगत व्यक्त केले.