गोंदिया,दि.15-ः येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्वंतत्र इमारत तयार करण्याचे काम तत्काळ सुरू व्हावे. या सोबतच जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारे प्रलंबित असलेले काम सुरू करावे, या विषयावर खा. प्रफुल्ल पटेल यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यासह संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यासोबत मुंबई येथे मंत्रालयात १३ फेब्रुवारी रोजी आढावा बैठक घेतली. यावेळी मेिडकल कॉलेज इमारतीचा प्रश्न निकाली काढून इमारत बांधकामाला कामाला तत्काळ सुरुवात करावी, यासंदर्भात खा. पटेल यांनी संबंधित अधिकार्यांना निर्देश दिले.
येथील वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळून हे कॉलेज सध्या केटीएस रुग्णालयातच सुरू आहे. त्यामुळे या महाविद्यालयाचे अस्तित्वच कुणालाच जाणवत नाही. वैद्यकीय महाविद्यालयासाठी कुडवा परिसरात १0 हेक्टर भूमिअधिग्रहित करण्यात आली आहे. सोबतच इमारतीच्या बांधकामासाठी ४४८ कोटी रुपये किमतीच्या अंदाजपत्रकास सुद्धा प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच बांधकाम करण्यासाठी बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयताच्या धर्तीवर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. असे असताना वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाला अजून सुरुवात झाली नाही. तसेच केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत शहराच्या पश्चिम बाजूस असलेल्या नंगपुरा र्मुी, कारंजा, पिंडकेपार, ढाकणी या ८.५0 किमी रस्त्याच्या बांधकामासाठी ४२ कोटी रुपये मंजुरी देण्यात आली आहे. रस्त्याच्या बांधकामासाठी भूमी सुद्धा संपादन करण्यात आली आहे. मात्र, या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. सोबतच गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचए १) निधी अंतर्गत सुरु व प्रस्तावित असलेल्या सर्व कामाची सद्य:स्थिती व इतर विषयाबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला.
मेडीकल कॉलेजची इमारत व रस्त्याचे काम या सोबत जिल्ह्याच्या विकासाला चालना देणार प्रलंबित विकास कामातील अडथळे दूर करुन विकासकामे तातडीने सुरु व्हावीत, यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल अधिकार्यांना निर्देश दिले. बैठकीत वैद्यकीय शिक्षण सचिव संजय मुखर्जी, आ. राजू कारेमोरे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता जायस्वाल, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.





