गडचिरोली,दि.14: फेब्रुवारी महिन्यात दहावी व बारावीच्या अंतिम प्रमाणपत्र परीक्षा होत आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील परीक्षा यशस्वी आणि कॉपीमुक्त होण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दक्षता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी कॉपीमुक्त गडचिरोली अभियानासाठी विविध भरारी पथकांतून प्रत्येक परीक्षा केंद्रावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील दहावीच्या 73 तर बारावीच्या 48 परीक्षा केंद्रांसाठी सहा भरारी पथक तयार करण्यात आले आहेत. दक्षता समितीची बैठक अपर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, शिक्षणाधिकारी माध्यमिक आर.पी.निकम, पोलीस अधिक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी दिपरत्न गायकवाड, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक, महिला भरारी पथक प्रमुख व्ही. एन. येगलोपवार, आय.आर.राऊत, विस्तार अधिकारी गेडाम आदी उपस्थित होते.
जिल्हयातील परीक्षा केंद्रावरील व्यवस्था, कॉपीमुक्त अभियान, परीक्षा केंद्रापासून 100 मी अंतरावरील नियम, पोलीस बंदोबस्त अशा विविध विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. विशेष बाब म्हणून यावेळी तहसिलदार व गटविकास अधिकारी यांनाही विविध परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत लेखी सूचना दिलेल्या आहेत. भरारी पथक व तालुकास्तरीय भेटी या अचानक व न सांगता पार पाडाव्यात म्हणजे संबंधित केंद्रावरील सत्य परिस्थिती पडताळता येईल, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
जिल्हयात इयत्ता 10 वी साठी 17,489 मुले परिक्षेला आहेत तर 12 वी साठी 13,955 मुले आहेत. इयत्ता 10 वी ची परीक्षा 3 फेब्रुवारी ला सुरु झाली आहे, ती 23 मार्च रोजी संपत आहे. तसेच इयत्ता 12 वी ची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होणार आहे.
परीक्षाकेंद्रावर मोबाईल बंदीबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्याद्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना परीक्षावेळी मोबाईल न वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा नियमांचे पालन न केल्यास संबंधितावर कारवाई केली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर परीक्षेसंबंधी जबाबदारी न दिलेल्या शिक्षक व इतर कर्मचारी यांना येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अशे कर्मचारी परीक्षा केंद्राजवळ अढळल्यास अशा कर्मचाऱ्यावरही कारवाई केली जाणार आहे.





