वाशिम, दि. १9 : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी निर्देशित केलेल्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅम व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष यांच्या आदेशान्वये मा. न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या जनहित याचिकामधील आदेशानुदार १७ फेब्रुवारी रोजी काटा येथे ज्येष्ठ नागरिकांकरिता विविध योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर इंगोले यांनी ज्येष्ठ नागरिकांकरिता विविध योजनांविषयी माहिती देणारा जनजागृती कार्यक्रम सादर केला. विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी सुध्दा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी नागरिकांना विविध कायद्यांविषयी माहिती दिली. शुभम लुंगे यांनी मोटार अपघात दावा प्रणालीविषयी तर महिला सुरक्षा या विषयावर पारस पटेल यांनी मार्गदर्शन केले. गणेश जाधव यांनी माहिती अधिकार, अविनाश खंदारे यांनी ज्येष्ठ नागरिक कायदा २००७ याबाबत मार्गदर्शन केले. अॅड. पी. ए. शेळके यांनी विधी सेवा प्राधिकरणविषयी माहिती दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे यांनी कार्यक्रम आयोजनाचा हेतू विषद करून ज्येष्ठ नागरिक कायद्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. उपसरपंच, न्यायालयाचे बेलीफ तसेच ज्येष्ठ नागरिकांची यावेळी उपस्थिती होती. सरपंच किशोर देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.





