अरमोरी,दि.24ः- स्थानिक उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी कक्ष गेल्या चौदा महिन्यांपासून कुलूपबंद आहे. या सोनोग्राफी कक्षाला डिसेंबर २0१८ पासून तज्ज्ञ डॉक्टर मिळेना अशी परिस्थती निर्माण झाली आहे. तज्ज्ञ डॉक्टराच्या प्रतिक्षेत येथील सोनोग्राफी सेंटर ओस पडलेले आहे. यामुळे येथे तपासणी करिता येणार्या गरीब गरोदर मातांना सोनोग्राफीसाठी इतरत्र जावे लागत असल्याने गरोदर मातांची हेळसांड होत आहे.
आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणीकरिता येणार्या गरोदर माताना सोयीचे व्हावे यासाठी लाखो रूपये खर्च करून सोनाग्राफी कक्ष उघडण्यात आले. मोठय़ा थाटामाटात त्याचे उद््घाटनही तीन वर्षापूर्वी करण्यात आले. जवळपास दोन वष्रे हे सेंटर चालल्यानंतर गेल्या चौदा महिन्यापासून म्हणजे डिसेंबर २0१८ पासून हे कक्ष बंद पडले आहे.
आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालय आरमोरी तालुक्यातील ग्रामीण भागासह वडसा, कुरखेडा, धानोरा व नजीकच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील रुग्ण व गरोदर माता तपासणीकरिता येत असतात. रुग्णालयात दर सोमवार व शुक्रवारला गरोदर माताची तपासणी करिता मोठी गर्दी होत असते. तपासणी झालेल्या महिलांना डॉक्टारांच्या सल्लयानुसार सोनोग्राफीसाठी तारीख दिली जात होती. महिन्यातील पहिला व तिसरा बुधवार असा सोनाग्राफी काढण्याचा दिवस ठरलेला होता. ठरलेल्या दिवशी गरोदर मातांची सोनोग्राफी काढण्यात येत होती.
सोनोग्राफी कक्ष नियमित सुरू असताना डिसेंबर २0१८ पासून सोनोग्राफी काढण्यासाठी येणारे तज्ज्ञ डॉक्टर येणे बंद झाले तेव्हापासून गेल्या १४ महिन्यांपासून हे सोनोग्राफी सेंटर कुलूपबंद आहे. तेव्हापासून सोनोग्राफी कक्ष चालविण्यासाठी नवीन तज्ज्ञ डॉक्टर देण्यात आला नाही व जुन्या डॉक्टराकडेही जबाबदारी देण्यात आली नाही. त्यामुळे डॉक्टराअभावी सोनोग्राफी कक्ष ओस पडलेले असून लाखा रूपयांची मशिन धुळखात पडलेली आहे.
आरमोरी रुग्णालयात नियमित तपासणी करीता येणार्या गरोदर माताना सोनोग्राफीसाठी त्या अवस्थेत गडचिरोली, ब्रम्हपुरीसारख्या ठिकाणी गरोदर मातांना जावे लागते. गरीब गरोदर माताना खाजगी सोनोग्राफी सेंटरमध्ये जाऊन सोनोग्राफी काढावी लागत असल्याने शारीरिक मानसिक व आर्थिक दृष्ट्या हेळसांड होत आहे. मात्र, याकडे रुग्णालय प्रशासनाने डोळेझाक केली आहे. तज्ज्ञ डॉक्टराअभावी ओस पडलेले सोनोग्राफी कक्षाला डॉक्टर केव्हा मिळणार व त्रास कमी होणार, असा प्रश्न गरोदर मातांकडून विचारला जात आहे.





