आरमोरी,दि.24ः- तालुक्यातील सिर्सी गट ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंचांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २३ फेब्रुवारीला सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास विहिरगाव येथे घडली. तामराव मोतीराम सहारे (४५) असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार तामराव सहारे हे २0१५ साली झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यानंतर दोन वर्षापूर्वी सिर्सी गट ग्रामपंचायतीचे उपसरपंच पदावर विराजमान झाले. दरम्यान सकाळी दहा ते अकराच्या सुमारास घरी कुणीही नव्हते याच संधीचा फायदा घेऊन विष प्राशन केले. याबाबतची माहिती गावांमध्ये पसरताच नातेवाईकांनी लगेच त्यांना गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारादरम्यान ११.३0 वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. उपसरपंच तामराव सहारे हे मागील चार-पाच दिवसांपासून तणावात होते, आणि ते मानसिक तणावातूनच विष प्राशन केल्याचे बोलल्या जात आहे. उपसरपंच सहारे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असून त्यांच्या मृत्यूमुळे विहीरगाव परिसरामध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे.




