
गडचिरोली, ता.२१: पाच दिवसांपूर्वी अपहरण केलेल्या पोलिस पाटलाच्या मुलाची नक्षल्यांनी गोळया घालून हत्या केल्याची घटना आज सकाळी अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे उघडकीस आली. रवींद्र शंकर सुनकरी(२४) रा. कोडसेलगुडम असे मृत युवकाचे नाव आहे. रवींद्र हा एसपीओ म्हणून काम करीत असल्याचा नक्षल्यांचा संशय होता.
१६ मे च्या मध्यरात्री १० ते १५ सशस्त्र नक्षलवादी कोडसेलगुडम गावात गेले. त्यांनी गावचे पोलिस पाटील शंकर सुनकरी यांना झोपेतून उठवले आणि त्यांचा मुलगा रवींद्र यास गावाबाहेर घेऊन गेले. तब्बल पाच दिवस रवींद्र घरी परतला नाही. अपहरण केल्यानंतर रवींद्रच्या कुटुंबीयांनी त्याचा परिसरात शोध घेतला. परंतु तो आढळला नाही. आज सकाळी रवींद्रचा मृतदेह कमलापूर-छल्लेवाडा मार्गावर रक्ताच्या थारोळयात आढळून आला. नक्षल्यांनी त्यांची बंदुकीच्या गोळया घालून हत्या केली. घटनास्थळी नक्षल्यांनी काही पत्रकेही टाकल्याचे आढळून आले आहे. रवींद्र हा एसपीओ(विशेष पोलिस अधिकारी) म्हणून काम करीत होता आणि नक्षल्यांची माहिती पोलिसांना देत होता, असा नक्षल्यांचा संशय होता. विशेष म्हणजे, रवींद्रचे अपहरण झाल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी त्याचे अपहरणाचे वृत्त फेटाळून लावले होते.




