38.1 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home Featured News कोरोना विषाणू आजार : काळजी व उपचार

कोरोना विषाणू आजार : काळजी व उपचार

0
312

भंडारा,दि. 18:- कोरोना हे विषाणू समूहाचे नाव आहे. विषाणू भारताला पूर्वीपासून माहिती आहे. 2003 मध्ये आढळलेला सार्स हा आजार किंवा 2012 मध्ये आढळलेला मर्स हा आजार हे सुध्दा कोरोना विषाणूमुळे होणारा आजार आहेत. परंतु 2019 मध्ये चीनच्या वुहान शहरात सुरु झालेल्या उद्रेकामुळे जो कोरोना विषाणू आढळला तो पुर्वी च्या कोरोना विषाणूपेक्षा वेगळा आहे म्हणून त्याला नॉवेल अर्थात नवीन करोना विषाणू असे संबोधन्यात येते. जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूस कोविड 19 असे नाव दिले आहे.

  • कोरोना विषाणू आजाराची लक्षणे व प्रसार

सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, ताप, निमोनिया, काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे असे लक्षणे कोरोना विषाणू आजारात आढळतात. हा आजार शिंकण्या, खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून पसरतो. शिवाय शिंकण्या खोकल्यातून उडालेले थेंब आजूबाजूला पृष्ठभागावर पडतात. अशा पृष्ठभागाला स्पर्श केल्याने हे थेंब हाताला चिकटतात. हाताने वारंवार नाक, डोळे, चेहरा चोळल्याने देखील हा आजार पसरु शकतो. कोरोना विषाणू आजारावर कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध नाही. रुग्णास त्याच्या लक्षणानुसार उपचार केले जातात.

कोरोना आजार होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी

आजारी असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क ठेवतांना संसर्ग न होण्याची काळजी घेणे, वारंवार हात धुणे, शिंकतांना, खोकलतांना नाकातोंडावर रुमाल घेणे, अर्धवट शिजलेले कच्चे मास खाऊ नये, फळे, भाज्या न धुता खाऊ नये.

ताप, खोकला, श्वसनास त्रास होणाऱ्या व्यक्तीने कोरोनाबाधित देशात प्रवास केला असल्यास कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आले असल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा.

  • जिल्हास्तरावर केलेली कार्यवाही

वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे. खाजगी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कोरोना आजाराच्या बाबत कार्यशाळा घेण्यात आली आहे. आयसोलेशन वार्ड येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. व्हायरल ट्रासपोर्ट मिडिया तयार करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर शिघ्र प्रतिसाद चमु तयार करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरावर एक रुग्ण वाहिका कोरोना वार्डसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे. तसेच जिल्हास्तरावर वैयक्तिक प्रतिबंधक किट व मॉस्क मुबलक उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी:-  जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय -क्रमांक 07184-252247 आणि  आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भंडारा क्रमांक 07184-252317 व राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 91-11-23978046, राज्यस्तरीय नियंत्रक कक्ष क्रमांक 020-26127394, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 104  यावर संपर्क साधावा.

  • काय करावे 

आपले हात वारंवार स्वच्छ धुवा, खोकलणाऱ्या किंवा शिंकणाऱ्या व्यक्तीपासून 3 फूट दुर रहा, डोळे, नाक व तोंडाला स्पर्श टाळावे, खोकलतांना व शिंकतांना तोंडावर रुमाल धरावा. ताप, खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे तसेच सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होणे टाळावे.

  • काय करु नये

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, ताप व खोकला यासारखी लक्षणे असतांना इतरांशी निकटचा संपर्क ठेवणे प्राण्यांशी थेट संपर्क, तसेच कच्चे अर्धवट शिजलेले अन्न खाणे आदि बाबी करु नये.

00000