32.4 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home विदर्भ ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना

‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना

शिकाऊ अनुज्ञप्ती अपॉइंटमेंटचा दैनंदिन कोटा १० टक्केने कमी एका वेळी एकाच उमेदवाराची मौखिक चाचणी; संगणकावरील चाचणी बंद

0
295

वाशिम, दि. १9 : कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात विविध कामानिमित्त मोठ्या प्रमाणात अभ्यागतांचे येणे-जाणे सुरु असते. त्यामुळे गर्दी जमा होवून कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये, यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ३१ मार्च २०२० पर्यंत शिकाऊ अनुज्ञप्तीकरिता अपॉइंटमेंटचा दैनंदिन कोटा १० टक्केने कमी करण्यात आला आहे. तसेच ३१ मार्चपर्यंत शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी घेतलेल्या अर्जदारांचे अपॉइंटमेंट पुढील महिन्यामध्ये रिशेड्युल करण्यात येतील. ज्या अर्जदारांची शिकाऊ अनुज्ञप्ती ३१ मार्च २०२० पूर्वी संपणार आहे, अशा अर्जदारांची पक्क्या अनुज्ञप्तीची चाचणी घेण्यात येईल. इतर सर्व पक्की अनुज्ञप्तीचे अपॉइंटमेंट पुढील महिन्यात रिशेड्युल करण्यात येतील.

एका वेळेस फक्त एका नागरिकाची शिकाऊ अनुज्ञप्तीची मौखिक परीक्षा घेण्यात येईल. संगणकावर चाचणी घेण्यात येणार नाही. ३१ मार्च २०२० पर्यंत कार्यालयामध्ये फक्त अनुज्ञप्तीचे नुतनीकरण, वाहनांच्या पुनर्नोंदणी, योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण, परवाना संबंधी कामेच करण्यात येतील. इतर कामे जसे वाहन हस्तांतरण, कर्ज बोजा नोंद इत्यादी कामे पुढे ढकलण्यात आली आहेत.

नवीन नोंदणीची सर्व कामे सुरु राहतील. सर्व शिबीर कार्यालये ३१ मार्च २०२० पर्यंत बंद करण्यात आली आहेत. योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण, पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी मोटार वाहन निरीक्षक यांनी ग्लाऊज व मास्क घालून काम करावे, वाहनांची खिडकी उघडी ठेवावी. कार्यालयामध्ये गर्दी होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. अत्यावश्यक प्रकरणात प्रकरणपरत्वे निर्णय घेण्याचे अधिकार कार्यालय प्रमुखांना राहतील, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.