गोरेगाव,दि.26ः-कोरोनाचा प्रादुर्भाव गावात होऊ नये म्हणून गोरेगाव नगरपंचायतीने बाहेर गावावरुन आलेल्यांना घरी बसून माहिती द्यावी, यासाठी वेब लिंक तयार केली आहे.या नगरपंचायतीच्या लिंकवर जाऊन 30 हून अधिक लोकांनी माहिती दिल्यांनी त्यांची घरीच आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तसेच विदेशातून देशात व एका गावाहून दुसऱ्या गावी परतणाऱ्यांना आरोग्य तपासणी करण्याची विनंती प्रधानमंत्री व राज्याचे मुख्यमंत्र्यांनी केली आहे.त्यामुळे गोरेगाव नगर पंचायतीचे नगराध्यक्ष इंजि.आशिष बारेवार यांनी नागरिकांना घराबाहेर न पडता माहिती देता यावी यासाठी नगरपंचायतीची स्वतंत्र वेबलिंक तयार केली. या लिंकमध्ये नागरिकांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, कुठून व कधी आले, आजारासंबंधी माहिती, होम क्वारंटाईनच्या शिक्क्याबद्दल माहिती भरता येत आहेत.ही माहिती नगरपंचायत गोळा करून तहसीलदारांमार्फत तालुका आरोग्य यंत्रणेला देण्यात येत आहे. आरोग्य यंत्रणेला ही माहिती मिळताच तासाभरात वैद्यकीय पथक त्यांच्या घरी जाऊन तपासणी करत आहेत. त्यांना जर काही लक्षणे आढळल्यास तत्काळ जिल्हा रूग्णालयात हलविण्यात येत आहे. गरज असल्यास होम क्वारंटाईनचे शिक्के मारुन घरीच राहण्याचा सल्लाही दिला जात आहे.




