नवी दिल्ली/वृत्तसेवा-केंद्र सरकार ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताची कोणतीही जीवित हानी झाली नाही असा, दावा करत होती. इतकेच नाही तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितले होते कि ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताची कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र आता प्रथमच केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर दरम्यान शहीद झालेल्या सहा जवानांची नावे अधिकृतपणे जाहीर केली आहेत.
सूबेदार मेजर पवन कुमार, राइफलमैन सुनील कुमार, लांस नायक दिनेश कुमार, एविएशन टेक्नीशियन मूड मुरली नाइक, सुनील कुमार सिंह, सार्जेंट सुरेंद्र कुमार अशी या शहीद जवानांची नावे आहेत.
लष्कराच्या 5 फील्ड रेजिमेंटचे लान्स नाईक दिनेश कुमार 7 मे रोजी शहीद झाले. तर 851 लाईट रेजिमेंटचे एव्हिएटर मूड मुरली नायक 9 मे रोजी, हवाई दलाच्या 39 विंगचे सार्जंट सुरेंद्र कुमार 10 मे रोजी शहीद झाले. याशिवाय, 4 जम्मू आणि काश्मीर लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार 10 मे रोजी शहीद झाले. 237 फील्ड वर्कशॉप कंपनीचे हवालदार सुनील कुमार सिंग 6 जून रोजी शहीद झाले. या शूर जवानांचा समावेश दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या वेबसाइटवरील ‘रोल ऑफ ऑनरश्मध्ये केला जाईल.
गेल्या वर्षी मे महिन्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करून ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. आता, सरकारने पहिल्यांदाच या ऑपरेशनमध्ये शहीद झालेल्या सहा भारतीय जवानांची नावे सार्वजनिकरित्या जाहीर केली आहेत. यानंतर, विरोधी पक्षांनी सरकारच्या भूमिकेवर आणि संसदेत दिलेल्या माहितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विरोधी पक्षांनी (विशेषतः काँग्रेसने) आरोप केला आहे की, या ऑपरेशनदरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगून सरकारने आधी संसदेची दिशाभूल केली होती
केंद्र सरकारने प्रथमच ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या सहा भारतीय जवानांची नावे जाहीर केल्याने वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस पक्षाने सरकारवर शहीदांची नावे दडवून ठेवल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले, ष्सरकारने या जवानांचे हौतात्म्य वर्षभर सार्वजनिक केले नाही. त्यांना जो सन्मान मिळायला हवा होता तो मिळाला नाही.
त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याचा एक व्हिडिओ शेअर केला. त्यात, एका प्रश्नाच्या उत्तरात राजनाथ सिंह यांनी म्हटले होते की, ऑपरेशन सिंदूरमध्ये कोणालाही इजा झाली नाही. खेरा म्हणाले, यामागे फक्त दोनच शक्यता आहेत. एकतर संरक्षण मंत्र्यांना त्यावेळी या सहा जवानांच्या हौतात्म्याबद्दल माहिती नव्हती, किंवा त्यांनी संसदेची दिशाभूल केली.
खेडा म्हणाले की जर हे खरे असेल, तर मंत्रालयाचे प्रमुख असलेल्या मंत्र्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होते. दुसरी शक्यता अशी आहे की संरक्षण मंत्र्यांना याची पूर्ण माहिती असूनही त्यांनी संसदेची दिशाभूल करणे निवडले. हे आणखी गंभीर आहे कारण यावरून हे सिद्ध होते की हे सरकार लोकशाहीच्या मंदिरात खोटे बोलते.ते पुढे म्हणाले की सहा शूर सैनिकांनी कर्तव्य बजावताना सर्वाेच्च बलिदान दिले हे सत्य बदलत नाही. त्यांनी आरोप केला की त्यांचे बलिदान लपवून ठेवण्यात आले. त्यांना मिळायला हवा असलेला आदर व सन्मान मिळाला नाही. ते असेही म्हणाले की,शहीदांच्या कुटुंबीयांना अपेक्षित असलेल्या पारदर्शकतेपासून वंचित ठेवण्यात आले. हा देशाच्या सैनिकांचा अपमान असून कोणताही खरा देशभक्त या विषयावर गप्प राहू शकत नाही.





