गोंदिया दि.27ः जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून लोकांची गर्दी टाळण्यासाठी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्था,इतर सामाजिक सेवा संस्था, मदत देण्यास इच्छुक असणारी व्यक्ती यांच्यामार्फत पुरविले जाणारे अन्न व इतर बाबी यांचे परस्पर वितरण करण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष डॉ. कादंबरी बलकवडे यांनी एका आदेशाद्वारे मनाई केली आहे.
सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गरजू लोकांना सर्वच स्तरातून मदत मिळणे देखील आवश्यक आहे. या आदेशाद्वारे सर्व स्वयंसेवी संस्था,इतर सामाजिक सेवा संस्था,एनजीओ,सेवाभावी संस्था तसेच मदत देण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्तींना कोणतीही मदत करावयाची असल्यास त्यांनी ती परस्पर न करता जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे स्थापन केलेल्या सीएसआर कक्ष प्रमुख जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती कावेरी बाखरे (98 50 314011) यांच्याशी संपर्क साधावा. जेणेकरून सर्व गरजू व्यक्तींना योग्य प्रकारे मदत पुरविणे शक्य होईल.वरील आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860(45) च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल.





