30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home Featured News ४० दिवसाच्या असंख्य आठवणीसह जड अंतकरणाने निरोप घेतोय

४० दिवसाच्या असंख्य आठवणीसह जड अंतकरणाने निरोप घेतोय

छत्तीसगड येथील कामगारांच्या भावना, विस्थापित नागरिक स्वगृही रवाना, प्रशासनाचे धन्यवाद

0
629

भंडारा,दि.०५ – झाडू निर्मिती व्यवसायासाठी भंडारा येथे आलेल्या व नंतर लॉकडाऊनमुळे अडकलेल्या छत्तीसगड येथील विस्थापित नागरिकांना ४० दिवसानंतर आज जिल्हा प्रशासनाने भंडारा येथून त्यांच्या स्वग्रामकडे सन्मानाने रवाना केले. ४० दिवसाच्या असंख्य आठवणीसह जड अंतकरणाने आपला निरोप घेतोय, अशा भावना छत्तीसगड येथील कामगारांनी या प्रसंगी व्यक्त केल्या. याप्रसंगी स्वगृही परतण्याचा अमाप आंनद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. कठीण अशा काळातील प्रशासनाची आपुलकी, सहकार्य व सेवा आयुष्यभर स्मरणात राहील, हा निरोप नसून नातं घट्ट करण्याचा क्षण असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या. जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीप चंद्रन, तहसीलदार अक्षय पीएम, आशा कवाडे व रजनी वैद्य यांचे त्यांनी आभार व्यक केले.

  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन असल्यामुळे जिल्हा व राज्याच्या सिमा सिल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात इतर राज्यातून आलेल्या कामगारांचा आपल्या राज्यात परतण्याचा मार्ग बंद झाला आहे. छत्तीसगड राज्यातील 34 कामगार लॉकडाऊनच्या दोन दिवस आधी भंडारा येथे झाडू विक्री करण्यासाठी आलेले होते. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर ते भंडारा विश्रामगृहाबाहेर ठिय्या लावून बसले होते. जिल्हा प्रशासनाने दखल घेवून या कामगारांचे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह  येथील निवारागृहात निवारा व भोजनाची व्यवस्था करुन दिली होती.

 निवारागृहात, दोन वेळेचे जेवण, चहा नास्ता, निवारा, वैद्यकीय तपासणी, योग वर्ग, लहान मुलांना चित्रकला साहित्य वितरण, हिंदी मुळाक्षरे ओळख, सही करण्याचे शिक्षण आणि विशेष म्हणजे झाडू निर्मितीतून आर्थिक उत्पन्न या सेवा उपलब्ध करून दिल्या. या सगळ्या व्यवस्थेवर सहायक आयुक्त सामाजिक न्याय विभाग आशा कवाडे जातीने लक्ष पुरवीत होत्या. प्रशासनाने त्यांना आर्थिक आधार तर दिलाच सोबतच साक्षर सुद्धा केले. निरक्षर असलेले हे कामगार आता लिहायला, वाचायला आणि आपली स्वाक्षरी सुद्धा करायला शिकले.

 मुळातच मेहनती असलेल्या या नागरिकांनी प्रशासनाच्या साहाय्याने ४० दिवसाचा टाळेबंदीचा काळ अतिशय सकारात्मकपणे पूर्ण केला. आणि आज ते आपल्या गावाकडे रवाना झाले. तहसीलदार अक्षय पोयाम यांनी ट्रॅव्हलने  कामगारांना आज त्यांच्या गावाकडे रवाना केले.

            *रोजगार व उत्पन्न*

            लॉकडाऊनमुळे रोजगारासाठी दूरवरुन राज्यात आलेल्या कारागिरांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला होता परंतु भंडारा जिल्हा प्रशासनाने जाणिवेने केलेल्या कार्यवाहीमुळे निवाऱ्यासोबत रोजगाराचा प्रश्नही सोडविला. भंडारा येथील निवारागृहात राहात असलेले 34 कामगार आपल्या परंपरागत झाडू बनविण्याच्या कौशल्यातून दिवसाला 8 हजार रुपयाचे उत्पन्न मिळवित होते.

            या ३४  कामगारांमध्ये १३ पुरुष, ११ महिला व १० बालकांचा समावेश आहे. निवारागृहात हे सर्व कामगार काही न करता बसून राहिल्याने कंटाळले होते. त्यासोबतच काम बंद पडल्याने कर्ज कसे फेडायचे, पैसा कुठून आणायचा म्हणून विवंचनेत होते. या संकटसमयी त्यांच्या मदतीला धावून आल्या त्या मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या गृहपाल रजनी वैद्य. त्यांनी झाडू निर्मितीसाठी लागणारे साहित्य दिले व बाजारपेठ उपलब्ध करून दिली.

            या उपक्रमामुळे त्यांना जीवन जगण्याची नवी आशा निर्माण झाली. निराशेच्या वातावरणातही त्यांना नवा उत्साह संचारला. झाडू निर्मितीमधून १ लक्ष ६० हजार रुपये उत्पन्न मिळाल्याने  या कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

            मेहनतीची तयारी आणि त्याला शासकीय यंत्रणेसह समाजाने पाठबळ दिल्यास प्रतिकुल परिस्थितही जगणे सुखकर करता येते असे या कामगारांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. त्यांना प्रशासनानेही तितकीच भक्कम साथ दिली आहे. आज हे सगळे कामगार अतिशय आनंदाने आपल्या गावी रवाना झाले. त्यांच्या आठवणी मागे ठेऊन.