23.9 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home Featured News मंदिरांच्या पैशाबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेले वक्तव्य कौतुकास्पद : प्रणालीताई मराठे

मंदिरांच्या पैशाबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेले वक्तव्य कौतुकास्पद : प्रणालीताई मराठे

0
852

मंदिरातील पैसा कुणाचा?-प्रणाली मराठे – धुळे.

मा.पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतीच मंदिरातील पैसा कोरोनामुळे देश आर्थिक संकटात सापडला असताना देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत करण्यासाठी कर्जरुपाने घ्यावा आणि आर्थिक स्थिती चांगली झाली की परत करावा अशी मागणी केली आहे.’देर आए पर दुरुस्त आए’ या म्हणी प्रमाणे मा.पृथ्वीराज चव्हाण यांना अर्थातच राष्ट्रीय काँग्रेसला उशीरा का होईना पण सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल. कारण गेली सहा सात दशके काँग्रेसची सत्ता असताना देवस्थानच्या धनसंपत्तीचे राष्ट्रीयीकरण का नाही केले गेले? यामागचे कारण आहे वोट बँक आणि कुणालाही आपली वोट बँक गमवायची नसते.देवस्थानची धनसंपत्ती शासनजमा करणे म्हणजे परिवर्तनाची क्रांती करणे होय आणि क्रांतीची सुरुवात कुणीही स्वतःपासून करीत नाही. म्हणतात ना शिवाजी जन्माला यावा पण तो दुसऱ्याच्या घरात. कारण आम्हाला त्याग आणि समर्पण करायचे नाहीच ना! मा. पृथ्वीराज चव्हाण यांनी मंदिरातील पैसा शासनजमा करण्याची केलेली मागणी खरंच कौतुकास्पद आहे. कारण त्यांनी निदान बोलायचे धाडस तरी दाखवले. नाहीतर ८५% सर्वसामान्य जनता मूग गिळून चूप आहे.
खरंतर देवस्थानचा पैसा कर्जरुपाने तरी का घ्यावा ? कारण दानाची सर्व संपत्ती ही जनतेचीच आहे. जनतेची संपत्ती जर जनतेच्या संकटकाळी उपयोगी पडली नाही तर तिचा काय उपयोग ? एकीकडे लॉकडाऊनमुळे लोक हाताला काम नसल्याने घरातच उपाशी मरत आहेत तर दुसरीकडे परप्रांतीय कामगार घराच्या ओढीनं उन्हातान्हात, अनवाणी पायाने, उपाशीपोटी, आपल्या लेकराबाळांना सोबत घेऊन, मरणयातना सहन करीत शेकडो मैल पायपीट करीत आहे.जीवघेणा प्रवास सुरू असताना काहींना तर आपला जीवही गमवावा लागला आहे.अशाप्रकारे मानव मरणयातना भोगून जीवन जगत असताना पाहून कदाचित देव असेल तर त्या देवालाही पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही. त्यालाही असं आवडणार नाही की,मी अब्जावधी रुपयांचे जडजवाहीर आणि सोन्याचांदीच्या, हिऱ्यामोत्यांच्या दागदागिन्यांनी मढलेला असतांना माझ्या लेकरांनी अशा अवस्थेत जीवन जगावं. कारण आपणच मानतो की अवघी सजीवसृष्टी ही ईश्वराची निर्मिती आहे आणि मानवप्राणी ही त्याची लेकरं आहेत.
मंदिरातील पैसा आणि धार्मिक भावना यांचा दुरायान्वयाने देखील संबंध नाही. संबंध आहे तो मंदिराचे विश्वस्त मंडळ आणि मंदिरावर पोट भरणाऱ्या पुजारी वर्गाचा.म्हणूनच संत गाडगे महाराज असे म्हणतात की – देवळात देव नसतो देवळात पुजाऱ्याचे पोट असते. दगडात देव नाही तर तो माणसात पहावा. माणसांची दुनिया हेच खरे देवाचे रुप आहे. दरिद्री नारायणाची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा आहे. आजही संत गाडगे महाराज यांचे विचार हे तंतोतंत लागू पडतात. परंतु येथील मुठभर लोक मात्र त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ नये म्हणून सर्वसामान्य जनतेला धार्मिकतेच्या नावाखाली फसविण्याचा प्रयत्न करीत असतात. स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री आणि हरित क्रांतीचे जनक डॉ.पंजाबराव देशमुख यांनी सुद्धा देवस्थानची धनसंपत्ती शासनजमा करुन तिचा उपयोग बहुजनांच्या शिक्षण व्यवस्थेवर करण्यासंदर्भातले बील संसदेत सादर केले होते. परंतु त्यावेळेस देखील डॉ.पंजाबराव देशमुख यांना मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि धार्मिकतेचा रंग देऊन बील नामंजूर करण्यात आले. जर त्याचवेळी हे बील मंजूर झाले असते तर उच्च शिक्षण घेऊन बहुजनांची स्थिती फार वेगळी राहिली असती आणि त्यांच्यावर आज अशी पायपीट करण्याची वेळच आली नसती. ज्या ज्या वेळी देवस्थानच्या संपत्तीचे राष्ट्रीयीकरण करण्याचा प्रश्न उपस्थित केला जातो त्या त्या वेळी मूठभर लोक त्यांच्या वर्णवर्चस्वासाठी आणि स्वार्थासाठी पुढे सरसावलेले दिसून येतात. हिंदू हृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे सुद्धा आपल्या’देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ या पुस्तकात लिहीतात की,हिंदूस्थान दरिद्री झाला, मातीतून अन्न काढणारा शेतकरी वर्ग भिकेला लागला, देशी धंदे ठार मेले, मध्यम वर्ग नामशेष झाला, सुशिक्षित पदवीधरांची उपासमार बोकाळली, इत्यादी इत्यादी वगैरे वगैरे आरडाओरड करण्यातच राजकारणी अकलेच्या कवायती करणाऱ्या ब्रम्हांड पंडितांनी हिंदूस्थानातील देवळांत केवढी अपार संपत्ती निष्कारण अडकून पडली आहे आणि तिचा उपयोग देशोध्दाराच्या कामी न होता,लुच्च्या- लफंग्यां-चो-जाट -ऐद-हलकटांच्या चैनीसाठी कसा होत आहे, इकडे आता कसोशीने लक्ष देण्याची वेळ आली आहे.
अशाचप्रकारे तोरणा किल्ल्यावर खोदकाम करताना धन सापडले असताना शिवरायांना प्रश्न पडला की या धनाचे काय करावे?कारण त्यामध्ये बऱ्याच देवदेवतांच्या मुर्त्या होत्या. त्यावेळी जिजाऊ असं म्हणतात की, शिवबा देवदेवतांची पूजाअर्चा करुन स्वराज्य मिळत नसतं.त्यासाठी धनाची आवश्यकता असते. स्वराज्यासाठी हया मूर्त्या वितळवून त्याचं सोनं करुन घे आणि ते स्वराज्याच्या कार्यासाठी उपयोगात आण.सुमारे चारशे वर्षांपूर्वी राजमाता जिजाऊ यांचे विज्ञानवादी विचार आपण लक्षात घेतले की, आजही आपण वैचारिक दृष्टीने किती मागास आहोत हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही.
आजच्या या भयावह परिस्थितीत डॉ.नरेंद्र दाभोळकरांच्या विवेकवादी दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता आहे.जर देवस्थानची धनसंपत्ती मग ती मंदिरातील असेल किंवा मशीद, चर्च, गुरुद्वारामधील असेल परंतु तिचा उपयोग जर गोरगरिबांची भूख शमविण्यासाठी, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि बहुजनांच्या शिक्षणासाठी होत असेल तर त्यास विरोध करण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. तिथे धार्मिकतेचा मुद्दा उपस्थित करण्यात काहीच अर्थ नाही. कारण माणसं जगली तर धर्म अस्तित्वात राहील. धर्म हा माणसासाठी असतो, धर्मासाठी माणूस नव्हे. परंतु मुठभर लोक जीवनमरणाचे प्रश्न बाजूला सारून नको ते मुद्दे उपस्थित करतात. विचारांची लढाई ही विचारांनीच लढायची असते. मात्र ज्यांच्यामध्ये अशी क्षमता नसते तेच लोक धार्मिक भावना भडकावून मूळ मुद्दयांना बगल देण्याचा प्रयत्न करीत असतात आणि आपल्याच माणसाला आपला शत्रू म्हणून आपल्या समोर उभं करण्यात यशस्वी होत असतात. याविरोधात सर्व शोषित पिडीत जनतेने आपल्या हक्क आणि अधिकारासाठी एकत्र येणे आवश्यक आहे.
प्रशासनाने जर अशाच प्रकारे गोरगरीब जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले तर एक वेळ अशी येईल की, याच शोषित – पिडीत लोकांमधून पुन्हा एकदा आदिवासी जननायक बिरसा मुंडा, अण्णाभाऊंचा नायक फकिरा निर्माण होतील जे या विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात एल्गार पुकारल्याशिवाय राहणार नाहीत.(साभार 3 वेजमिडिया)