34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Featured News वर्दीतील माणुसकी….

वर्दीतील माणुसकी….

0
282

blank

डॉ. राजू पाटोदकर, मुंबई.

जिसका कोई नही होता।
उसका पुलिसवाला होता है।

एका हिंदी चित्रपटातील हा प्रसिद्ध डायलॉग आहे आणि याची उत्तम प्रचिती या लाँकडाऊनच्या काळात आली.
विरार येथील पोलीस नाईक सुभाष शिंदे (२००७ ची बँच) यांनी, ज्याचे मुंबईत कोणीही नातेवाईक नव्हते अशा मयतास, त्याच्या दिल्लीतील भावाच्या सांगण्यावरून विधीवत अग्नीदाह देऊन अंत्यसंस्कार पार पाडले. मानवतेचा एक मोठा धर्म त्याने निभावला. त्याच्या कर्तव्यभावनेला मनःपूर्वक सलाम..
माझे कर्तव्य केले
विरार (पूर्व) भागातील फुलपाडा येथील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये एक इसम अस्ताव्यस्त पडलेला आहे, अशी माहिती मिळताच विरार पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक सुभाष शिंदे हे त्या ठिकाणी तात्काळ पोहोचले. सोसायटीचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी यांच्या मदतीने संबंधित फ्लॅटची तपासणी केली असता साधारणतः चाळीस- बेचाळीस वर्षाचा युवक कसलीही हालचाल न करता पडून असलेला आढळला. त्यास ॲम्बुलन्स बोलावून तातडीने दवाखान्यात नेले. पोस्टमार्टम अहवालानुसार हार्टअटॅकमुळे हा युवक मरण पावल्याचे स्पष्ट झाले. संबंधित मयताचा मोबाईल, आधार कार्ड व इतर ओळखपत्र शिंदे यांनी ताब्यात घेतली होती. मोबाईल बंद होता. तो चार्ज करतातच दिल्लीहून संबंधित इसमाच्या भावाचा फोन आला. त्याला भाऊ मरण पावल्याचे सांगितले व तातडीने येऊन डेडबाँडी ताब्यात घ्या, असा संदेश दिला. दुसऱ्या दिवशी दिल्लीहून त्या भावाचा फोन आला, लाँकडाऊन असल्यामुळे प्रयत्न करूनही येऊ शकत नाही त्यामुळे आपणच भावावर अंत्यसंस्कार करावेत अशी विनंती केली. blank
मरणानंतर एखाद्याची अवहेलना होणे हे माणुसकी धर्माच्या विरोधात आहे, त्यामुळे श्री शिंदे यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन कर्तव्यभावनेने अंत्यसंस्कार विधी पूर्ण केला. मयताचे अंतिम दर्शन व्हिडिओकॉलद्वारे त्यांच्या घरच्यांना दिले. एका वर्दीतील माणसाने अशा प्रकारे माणुसकी जपली.
कित्येक लावारिस प्रेतांची विल्हेवाट, अंतिम संस्कार पोलीस विभागाला सातत्याने करावे लागतात, पण ही बाब वेगळी आहे. एखाद्या व्यक्तीचे नातेवाईक आहेत पण लाँकडाऊनमुळे, कोरोनामुळे ते येऊ शकत नाहीत म्हणून एखाद्या अनोळखी व्यक्तीचा अंत्यसंस्कार त्याचे कुटुंबीय म्हणून करणे, ही बाब खरोखरच आगळीवेगळी आणि माणुसकी,मानवता धर्म निभावणारी आहे.
या घटनेची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांना समजल्यावर त्यांनी पोलीस नाईक सुभाष शिंदे यांना फोन करून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले. अशा प्रकारचेसमाजोपयोगी कार्य पुढेही त्यांच्याकडून घडो, अशा शुभेच्छा दिल्या.
याबद्दल बोलताना शिंदे यांनी सांगितले की, डायरेक्ट गृहमंत्री साहेबांचा फोन आला, त्यांनी माझे कौतुक केले. मला समाधान वाटले. खरोखरच गृहमंत्र्यांचा आम्हाला फोन येतो, ही बाब आमच्यासाठी मोठीच.. मला माजी गृहमंत्री आर. आर. आबांची आठवण झाली. श्री देशमुख साहेबही अगदी तसेच आहेत.
गृहमंत्री महोदयांचा फोन आल्याचे माझ्या घरी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा जवळील केत्तूर नं.२, पारेवाडी रेल्वे स्टेशन या गावात असलेल्या माझ्या आई-वडिलांना सांगितल्यावर त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला.
मयताच्या आईने मला दिल्लीहून फोन करून माझे आभार मानले, विरार येथे असलेला माझा एक मुलगा जरी गेला तरी तुझ्या रुपाने दुसरा मुलगा मिळाला, असे भावनाविवश होऊन म्हणल्या. दक्षिण आफ्रिकेतून मयताच्या बहिणीने फोन करून आभार मानले. मी तुम्हाला सांगतो मी फक्त माझे कर्तव्य केले, जे आम्हा प्रत्येक पोलिसाचे आहे, असे श्री. शिंदे म्हणाले.
लॉकडाऊनच्या काळात, दुसऱ्यासाठी नव्हे तर स्वतःसाठी, स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नियम पाळा असे सांगणाऱ्या पोलीस बांधवावर एकीकडे आपण धावून जातो, तर दुसरीकडे कोणीही जवळ नसताना लावारिस मरण पावल्यानंतर हाच पोलीस आपल्यासाठी माणुसकीच्या नात्याने भाऊ , मुलगा होऊन धावून येतो…किती हा विरोधाभास.

blank