विदर्भातील विद्यार्थी चळवळ, भंडारा जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य आणि आता विधानसभा अध्यक्ष असा सामाजिक-राजकीय कारकिर्दीचा चढता आलेख असलेले धडाडीचे नेतृत्व म्हणजे मा.श्री.नानाभाऊ पटोले. शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न आणि गोरगरिबांचा-वंचितांचा सदैव कैवार हे त्यांच्या गत 30/35 वर्षांच्या वाटचालीतील समान सूत्र आहे. स्वभाव चळवळ्या आणि आक्रमक असल्याने सत्तापदापेक्षा कार्यकर्तेपणाशीच सलगी अधीक ! आज दिनांक 5 जून रोजी वाढदिवसानिमित्त त्यांचं मनःपूर्वक अभीष्टचिंतन.
शेतकरीहिताच्या आपल्या आग्रही भूमिकेशी ठाम राहत एकदा विधानसभा सदस्यत्वाचा आणि नंतर लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले मा.श्री.नानाभाऊ पटोले साहेब हे एक वेगळ्या धाटणीचे नेतृत्व आहे. कोरोना संकटाचा फटका सर्व समाजघटकांना बसला आहे.शेतकरी आणि श्रमिक बांधवांना त्याची तीव्र झळ सोसावी लागत आहे.अशा परिस्थितीत त्यांनी नागपूर आणि भंडारा येथे प्रत्यक्ष दौरा करीत,बैठका घेत मदत यंत्रणा गतीमान केली.लॉकडाऊनमुळे आपल्या राज्यातील अनेक जण अन्य राज्यात, अन्य राज्यातील अनेक जण आपल्या राज्यात तसेच अनेक जण दुसऱ्या जिल्हयात अडकून पडले होते. यासंदर्भात त्यांनी विधानमंडळ, मुंबई येथे संपर्क आणि समन्वय कक्ष स्थापन करून राज्यातील विधानसभा, विधानपरिषद सदस्यांशी संपर्क साधत अशा अडकलेल्यांची सूची बनवून स्थानांतरासाठी सर्वांना उचित मदत प्राप्त करून दिली.संकटाला न डगमगता त्याचा मुकाबला करणे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. कोरोनामुळे आणखी आर्थिक संकटात सापडलेल्या विदर्भातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी युद्धपातळीवर भंडारा जिल्ह्यात दाभा येथे दूधभुकटी तयार करण्याचा कारखाना त्यांच्याच अविश्रांत पाठपुराव्यामुळे सुरू होऊ शकला.’ इच्छा असेल तर मार्ग दिसेल’ या जाणीवेने वंचित घटकांना मदत आणि विकास योजनांसाठी तळमळीने पाठपुरावा करणारी त्यांची कार्यपद्धती सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे.विकासाच्या वाटेवर भंडारा-गोंदियासह संपूर्ण विदर्भ पुढे यावा यासाठी त्यांचा सतत प्रयत्न सुरू असतो.
1 डिसेंबर 2019 रोजी विधानसभा अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली. दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी त्यांचा गौरव करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्या भावना व्यक्त केल्या. उत्तरादाखल केलेल्या भाषणात मा.श्री.नानाभाऊ पटोले साहेब म्हणाले, -” विधानमंडळाचे अधिवेशन सुरू होते तेव्हा राज्यातील कोटी कोटी जनता सभागृहाकडे कान आणि डोळे लावून असते.त्यांच्या पदरी निराशा पडणार नाही आणि याउलट संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न सुटू शकतात असा विश्वास वाटेल, यादृष्टीने आपण सर्वजण यापुढे कार्यरत राहूया …” आणि खरोखरच पुढील काळात
ओबीसी जनगणनेचा मुद्दा असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो वा जनसामान्यांच्या हिताचे काही निर्णय असो,त्यांनी या संकल्पाशी बांधील राहत कार्यवाही केली, करीत आहेत. ते आणि विधान परिषदेचे सभापती मा.श्री.रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विधानमंडळाचे आधुनिकीकरण- पेपरलेस डेमोक्रसीच्यादृष्टीने ऑन लाईन प्रश्नस्वीकृती, वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे आयोजित विविध उपक्रम, चर्चासत्र, महनीय नेत्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संस्मरण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
मा.श्री.नानाभाऊ पटोले साहेब म्हणजे, आपली समस्या ऐकणारा आणि ती सोडवण्यासाठी सर्व मदत देऊ करणारा हक्काचा माणूस, असा विश्वास त्यांनी केवळ विदर्भातीलच नव्हे तर सर्व राज्यातील जनतेमध्ये निर्माण केला आहे. त्यामुळेच गावाकडचा छोटामोठा कार्यकर्ता समस्या घेऊन त्यांच्याकडे येऊ शकतो,त्यांना सहज भेटू शकतो.जनसामान्यांच्या प्रश्नासाठी अशाप्रकारे सदैव संवेदनशील असणाऱ्या मा.श्री. नानाभाऊ पटोले साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…सर, जीवेत शरद: शतम !





