
अर्जुनी मोरगाव,दि.22:तालुक्यातील बोडगावदेवी वनक्षेत्रांतर्गत सोनेगाव -तिडका मार्गावरील बोदरा कक्ष क्र २७९ मध्ये आज सोमवारला १२ वाजेच्या सुमारास जखमी बिबटला जेरबंद करण्यात आले. सध्या त्याला नवेगावबांध येथील वनविभागाच्या परिसरात नेण्यात आले आहे. प्राथमिक उपचारानंतर त्याला गोरेवाडा ( नागपूर )येथे हलवले जाणार आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी गोंदिया वनविभागाच्या शीघ्र कृती दलाने तब्बल दोन तास परिश्रम घेतले. तो नेमका कशामुळे जखमी झाला ते वैद्यकीय परिक्षणानंतर कळणार आहे.सोनेगाव – तिडका मार्गावर बिबट जखमी असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. लगेच वनपरिक्षेत्र अधिकारी बी.टी.दुर्गे आपल्या सहकाऱ्यांसह बोदरा जंगलाकडे रवाना झाले.रस्त्याच्या कडेला असलेल्या टीसीएम नालीत बिबट बसलेला दिसून आला. त्याची हालचाल होत नसल्याने तो जखमी झाला असावा असा तर्क काढण्यात आला. काही वेळातच त्याने समोरच्या पायांचा आधार घेत सरपटत नालीचा उंचवटा ओलांडला. त्याच्या या हालचालीवरून तो पायाने चालू शकत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शीघ्र कृती दलाला पाचारण करण्यात आले. शीघ्र कृती दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पिंजऱ्यात अडकविण्यावर शिक्कामोर्तब केले. लगेच नवेगावबांध येथून पिंजरा बोलावण्यात आला व त्या बिबटला अलगद पिंजऱ्यात कैद करण्यात शीघ्र कृती दलाला यश आले. या बिबटचे वय सुमारे अडीच ते तीन वर्षे असून वाहनाच्या धडकेत, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात की आजारपणामुळे जखमी झाला ते अद्याप स्पष्ट झाले नाही. यावेळी बिबट बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. मोहीम यशस्वी करण्यात वनपरिक्षेत्र अधिकारी बी टी दुर्गे, क्षेत्र सहाय्यक उमेश गोटेफोडे, वेलतुरे, शीघ्र कृती दलाचे क्षेत्र सहाय्यक राजेंद्रसिंग बहुरे, मिथुन चव्हाण, चंद्रकांत गोडे, प्रवीण केळवतकर, दीपक बरडे, मुकेश सोनवाने, धार्मिक तसेच वन कर्मचा?्यांनी परिश्रम घेतले.





