खेमेंद्र कटरे,गोंदिया- गावात असलेले वाडे किंवा पाटलांचे बंगले म्हणजे जुन्या काळातील वैभवाचे दर्शन करविणारे रूप आहेत. मात्र कालौघाने या वास्तूंना भग्न रूप आले आहे. पण हे वाडे किंवा पर्यटन स्थळांच्या आसपास अनेक वर्षांपासून रिकामे असलेले बंगले पर्यटकांच्या निवासासाठी महत्त्वाचा दुवा ठरू शकतात. हा विचार करून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी ‘निवास आणि न्याहारी योजनाङ्क हा अनोखा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केलेला होता.त्या प्रयत्नाला पुर्व विदर्भातील जवळपास २९ घरमालकांनी पसंती दिली होती.यामध्ये अधिक थोडं व्यापक आणि ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी व शहरी पर्यटकांना ओडण्यासाठी आजही डौलाने उभ्या असलेल्या या वाड्या व हवेलीचा उपयोग एक पर्वणी ठरू शकते.
नागपूर शहर व जिल्ह्यातील ११, चंद्रपूर जिल्ह्यातील १२, गोंदिया ४ तर भंडारा व वर्धेतून प्रत्येकी एकाने नोंदणी केली होती.मात्र त्यावरच न थांबता आजही अनेक असे वाडे आहेत,की ते मोठ्या राजवाड्यांसारखे आपल्या आर्थिक स्त्रोताचे साधनही ठरू शकतात.राजस्थानाताली राजवाड्याचा विचार केल्यास त्या राजघराण्यांनी आपल्या राजवाड्यातील एका भागाला जनतेकरीता खुले करुन आर्थिक स्त्रोत निर्माण केले आहेत,हीच बाब विदर्भात वाडे व हवेली मालकांनी कळली.तर पुर्व विदर्भात नव्या पर्यटनाचा मार्ग मोकळा होणार आहे.
याबाबत बोलतांना महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे बेरार टाईम्सशी बोलतांना म्हणाले की,ग्रामीण भागातील वाड्यांची संस्कृती ही आपल्या महाराष्ट्राच्या पर्यटनविकासासाठी महत्वाची बाब आहे.आपण गोंदिया जिल्हाधिकारी असतांना गोंदियात प्रायोगिक तत्वावर १०० वर्ष जुन्या अशा वाड्यांचा शोध घेण्याचा विचार केलेला होता.मात्र ते होऊ शकले नाही.परंतु योगायोगाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची जबाबदारीच आपल्याकडे आल्याने आणि हा विषय आपल्या आवडीचा असल्यामुळे करोना संसर्गाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर पुर्व विदर्भातील सर्वच जिल्हाधिकारी यांना आपण पत्र पाठवून त्या त्या जिल्ह्यातील १०० वर्ष जुने वाडे व हवेली यांची माहिती मागविणार आहोत.मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्या वाडे व हवेलीधारकांशी सवांद साधून (होम स्ेट)फक्त २ खोल्यामध्ये निवासाची व्यवस्था आणि न्याहारी हा उपक्रम राबविण्याची योजना आखलेली आहे.
वाडा संस्कृती बदल पहिल्यांदाच पुढाकार,‘वाडा‘ वैभवाचे प्रतीक – अनिल देशमुख,माजी उपायुक्त समाजकल्याण व अभ्यासक वाडासंस्कृती गोरेगाव
पुर्व विदर्भातील व विशेषतः गोंदिया , भंडारा जिल्ह्यातील संस्कृती, वारसा व पर्यटन सामथ्र्याकडे लक्ष वेधले आहे. नागझिरा-नवेगांव बांध आता विश्व प्रसिद्ध झाले आहे, त्यामुळे पर्यटकांसाठी आकर्षक निवारे उपलब्ध करुन देण्यासाठी हे जूने वाडे उपयोगी ठरणार आहेत, तर या वाड्यांना‘हेरिटेज बिल्डिंग‘चा दर्जा देऊन, शासनातरफे डागडुजी केल्यास ग्रामीण कारागिरांची ‘कसब‘ संरक्षित राहणार आहे. या जिल्ह्याचे जूने वैभव परत येऊन ग्रामस्थांचा स्वाभिमान उंचावण्यास मदत होणार आहे.प्रशासन, राजनीतिक नेतृत्व, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून या बाबत मोठी अपेक्षा आहे. ‘वाडा‘ जरी वैभवाचे प्रतीक असले तरी तत्कालीन गरजेनुसार स्थानिक पातळीवर उपलब्ध मनष्यबळ व साहित्याचा वापर करून बांधले गेले होते. बारा बलुतदारापैकी सुतार,लोहार(वाढई), कुंभार व साध्या ग्रामीण मजुरांनी माती, लाकूड, बांबूचा वापर करून तयार केलेली सर्वात्कृष्ट निर्मीती आहे. अत्यंत जुन्या वाड्यात एका लोखंडी खीळयाचा सुध्दा वापर केलेला नाही. लोखंडाचा वापर नंतरच्या काळात बांधलेल्या वाड्यात दिसुन येतो. पुर्ण बांधकाम मातीचे आहे,त्यामुळे आतील खोल्या वातानुकूलित आहेत. सर्वसाधरणपणे वाडे दोन किंवा तीन मजली आहेत. मुख्य इमारत मधल्या भागात व आजू-बाजू ला चौफेर ‘सरई‘ चे बाधंकाम आहे. या लांबच लांब इमारतीचा उपयोग सुरक्षेसाठी, गुरांचे गोठे , बैलगाड़ी, शेती चे साहित्य (नांगर,वखर ई),धान्यसाठा, पशुखाद्य, लाकूडफाटा, व शेती विषयक बाबी जतन करून ठेवण्यासाठी करण्यात येते. मुख्य वाड्याच्या समोरच्या भागातील सरई मध्ये मुख्य दरवाजा असायचा त्याला ‘डहल‘ शब्दप्रयोग होत असे. डहलच्या आजूबाजूला दोन स्वतंत्र खोल्या असायच्या, कदाचित सुरक्षा यंत्रणा व नागरिकांच्या तक्रारी बाबत चर्चेसाठी कचहरी म्हणून वापर होत असे. वाडा आणि डहल यामध्ये मोठे विस्तीर्ण अंगण, अंगणात वाड्यासमोर मोठा मंडप,( मोहई, सालई या झाडांच्या फांद्या पासून तयार करून बांबूचे छत असलेले हिरवे मांडव) मग वाड्याची पहिली छपरी त्यानंतर थोड्या उंचीवर मोठी छपरी ज्यामध्ये पाटील, घरची मंडळी व पाहुण्यांसाठी बसण्याची सोय असायची. या भागात कलाकुसर युक्त जोडणीचे काम असायचे, छत लाकडी पट्ट्यांची असायची, वाड्यातील सर्वात दर्शनीय स्थल हेच. आतमध्ये माचघर, ओसरी, स्वयंपाक घर, दुग्धजन्य पदार्थ ठेवण्यासाठी घुसरण खोली, पूजा घर, पोट खोली, कणघर, जेवणाची खोली ( किंवा छपरी) असायची मागेसुद्धा अंगण असायचे. शेतमालावर प्रक्रियेचे कार्य या अंगणात होत असे उदाहरणार्थ वाळविणे, दळणे, कांडणे इत्यादी. कांडप, जाते, उखळ इत्यादी मागच्या भागात असायच्या. न्हाणीघर सुद्धा मागे असायचा त्यानंतर एक मोठी वाडी असायची, यामध्ये वर्षभर भाजीपाला उत्पादन होत होते. दोन किंवा तीन मजली वाड्यात धान्य साठविण्यासाठी ढोला वरच्या माडीवर असायचा, वरुन भरायचे व खालील छिद्रातून आवश्यकतेप्रमाणे धान्य घ्यायचे अशी पद्धत होती. ज्यावेळेस कागदी नोटाचे चलन नव्हते, बँकाही नव्हत्या तेव्हा चांदीची नाणी (कलदार) सुरक्षित ठेवण्यासाठी तळघराचा वापर करण्यात येत होता.आजही हे तळघर काही वाड्यात पाहण्यास मिळते.वाडा हा गौरवाचा विषय आहे. आताच्या परिस्थितीत वाडे बांधणे शक्य नाही, जे आहेत त्यांचा पुनरुद्धार करणे व सुरक्षित ठेवणे हाच एक उपाय आहे. –




