माहिती अधिकाराचा गैरवापर; खंडणी घेताना ‘तो’ रंगेहाथ जाळ्यात

0
90

पैशाची लुटमार करणारी टोळी गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय?

संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी पोलीसात तक्रार करावी.

नागपूर,दि.१ सप्टेंबर:- माहिती अधिकाराचे पत्र शासकीय कार्यालयात टाकून ब्लॉकमेल करून आर्थिक लुबाडणूक करणे आणि धमकावून पैसे वसुली करण्याचा धंदा गडचिरोली जिल्ह्यातील काही भुरट्या समाज सेवकांनी सुरू केला आहे. त्यामध्ये “” नाव मोठे .. पण काम लुटमारीचे “‘ असे चित्र समोर आले आहे. अशा भुरट्या दलालांचा शासकीय कार्यालयात काम करीत असताना संबंधित कर्मचारी आणि अधिकारी यांनी पोलीस विभागाकडे रितसर तक्रार केली पाहिजे. माहितीच्या अधिकारात पत्र लिहून आर्थिक लुटमार करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांना मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक त्रास सहन करावा लागत आहे, अशा प्रसंगी शासकीय कामात लक्ष लागत नाही. एकंदरीत या सर्व बाबींचा शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना सहन करावा लागतो याचा भुदंड शासकीय मालमत्तेवर होत असतो. असे प्रकार महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्हास्थळी झालेले आहेत. तर काही ठिकाणी अटकही झाली आहे.
माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीच्या आधारे हॉटेल चालकाकडे तीन लाखांची खंडणी मागणारा इसम अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याला पोलिसांनी खंडणी घेताना रंगेहाथ पकडले.
नगर उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठांकडे तक्रार करून तुझा हॉटेल परवाना रद्द करतो, अशी हॉटेल चालकाला धमकी देत त्याच्याकडे तीन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला खंडणीची काही रक्कम स्वीकारताना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने रंगेहाथ पकडले आहे. दिंगबर लक्ष्मण गेंट्याल असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, गेंट्याल याने माहिती अधिकार कायद्याचा वापर करीत हॉटेलच्या परवान्यासंबंधी माहिती मिळवली होती. या माहितीच्या आधारे परवाना रद्द करण्याची धमकी तो देत होता.
माहितीचा गैरवापर करणारा अटकेत झाला. एका हॉटेल व्यावसायिकाने उत्पादन शुल्क विभागाकडे दारू विक्रीसाठी लागणारा परवाना मिळण्यासाठी रितसर अर्ज केला होता. या अर्जावरुन त्यांना दारू विक्रीचा परवाना मिळाला होता व त्यावरून त्यांनी हॉटेल चालू केले होते. मात्र, आरोपी दिगंबर गेंटयाल याने संबंधित हॉटेल चालकाने मिळवलेल्या परवान्याबाबत माहिती अधिकारात अर्ज करीत उत्पादन शुल्क विभागाकडून कोणत्या कागदपत्राचे आधारे परवाना दिला, याबाबतची माहिती मागवून घेतली होती. उत्पादन शुल्क विभागाकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर गेंटयाल याने संबंधित हॉटेल परवाना हा नियमानुसार मिळाला नसून त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे हॉटेल चालकाला सांगितले. मी उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठांकडे तक्रारी करून तुझा हॉटेल परवाना रद्द करतो, अशी धमकी हॉटेल चालकाला त्याने दिली. तसेच संबंधित हॉटेल चालकास वारंवार फोन करून व समक्ष भेटून तीन लाख रुपये खंडणीची मागणी केली. त्यामुळे संबंधित हॉटेल चालकाने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे येवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांची भेट घेऊन तक्रार अर्ज दिला. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक पवार यांनी वरिष्ठांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अखीलेश कुमार सिंह यांनी अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना संबंधित हॉटेल चालकाने दिलेल्या अर्जावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्यासह कर्मचारी रविंद्र पांडे, दत्तात्रय गव्हाणे, रविंद्र कर्डीले, संदीप दरंदले, कमलेश पाथरुट, रोहित मिसाळ हे संबंधित हॉटेल चालक व सोबत सरकारी दोन पंच हे एक लाख रुपये घेऊन गेंटयाल याने सांगितलेल्या ठिकाणी गेले. त्याठिकाणी पोलिसांनी वेषांतर करून सापळा रचला व ते गेंट्याल याची वाट पाहत बसले. अखेर काही वेळात तेथे खंडणीची रक्कम घेण्यासाठी दिगंबर गेंट्याल हा आला व त्याने संबंधित हॉटेल चालकास खंडणीची मागणी केली. हॉटेल चालकाने त्याला एक लाख रुपये दिल्यानंतर ते घेताना पोलीस पथकाने त्यास झडप घालून जागीच ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या ताब्यातील एक लाख रुपये रक्कम हस्तगत केली असून संबंधित हॉटेल चालकाच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.