चुरडी हत्याप्रकरण— मारेकरी घरचाच की बाहेरचा… 

0
233

तिरोडा, दि.22 :  गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील ग्राम चुरडी येथे झालेल्या हत्याकांडात खरा मारेकरी कोण? घरचा की बाहेरचा. असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला आहे. एकाच कुटुंबातील रेवचंद बिसेन व मालता बिसेन हे पती-पत्नी. तर पौर्णिमा व तेजस ही त्यांची दोन मुले. या चौघाही जणांचे मृतदेह आढळल्यापासून गोंदिया जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

उल्लेखनीय म्हणजे, लोखंडी अवजड वस्तूने प्रहार करून मालता, पौर्णिमा व तेजस यांची अमानवीयरित्या हत्या करण्यात आली. तर, रेवचंद यांच्या शरीरावर एकही जखम नाही. त्यांच्या कपड्यांवर मात्र रक्ताचे शिंतोडे आहेत. या हत्याकांडातील आरोपी शोधण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले होते. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, आरोपींचा शोध घेण्यासाठी आणलेले श्वान घरातच फिरले, घुटमळले. त्यानंतर ते रेवचंदच्या मृतदेहाकडे बघून भुंकू लागले.

वैद्यकीय अधिकार्‍यांनी चारही मृतदेहांचा उत्तरीय तपासणी अहवाल देताना तिघांचा मृत्यू गंभीर दुखापतीमुळे व रेवचंदचा मृत्यू गळफास लावल्यामुळे झाल्याचा अहवाल दिला आहे. रेवचंदच्या शरीरावर कोणतीही जखम नाही. त्यामुळे आधी तिघांची हत्या करून नंतर रेवचंदने आत्महत्या केली काय? असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला आहे.

घरात लूटमारीचे कोणतेही चिन्ह नाही. झटापटीच्या कसल्याही खुणा नाहीत. त्यामुळे हा हत्याकांड घडवून आणणारा मारेकरी कोण? घरचा की बाहेरचा. असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. सध्या त्या दिशेने तपास सुरू आहे. त्यामुळे याबाबत सध्या काही सांगता येत नाही, असे पोलीस अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

काय म्हणतात पोलीस अधिकारी…

घटनास्थळाला जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींना काहीही सांगण्यास नकार दिला. मात्र तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.घटनास्थळावरची संपूर्ण स्थिती, श्वानाकडून मिळालेले संकेत आणि वैद्यकीय अहवाल लक्षात घेता मारेकरी बाहेरचा वाटत नाही. तरी सर्व बाजूंनी पोलीस तपास करीत आहेत. योग्य आणि ठोस निष्कर्ष निघाल्यावरच आरोपीचे नाव जाहीर करण्यात येईल.तिरोड्याचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी 302 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले. मात्र तपासकार्य पूर्ण झाल्याशिवाय ठोस काही सांगता येणार नाही असे ते म्हणाले.

या विचित्र घटनेमुळे समाजमन हेलावले. प्रथमदर्शनी हा प्रकार ऑनर किलिंगचा दिसून येत होता. रेवचंद बिसेन यांनी पत्नी, मुलगा आणि मुलीच्या हत्येनंतर स्वत: आत्महत्या केली असावी, असा कयास लावण्यात येत आहे. घटनेचा सर्व बाजूंनी तिरोडा पोलीस तपास करत आहेत.

मुलगा-मुलगी रविवारीच परतले घरी

रेवचंद बिसेन यांची मुलगी पौर्णिमा एमबीबीएसची आणि मुलगा तेजस अभियांत्रिकीची तयारी करत होते. ते नागपूर येथे क्लास करून तिथेच राहत होते. रविवारी नीटची परीक्षा झाल्याने ते घरी आले होते.