गोंदिया : दवनीवाडा पोलिस ठाण्यातंर्गत वाहन चोरी गेल्याने नोंद करण्यात आलेल्या अपराध क्रमांक ४४-२0२२ भादंवि कलम ३७९ या प्रकरणाला वेगळेच वळण आले असून तक्रार देणारा वाहन मालक खुद्दआरोपी निघाल्याचे उघडकीस आले आहे. स्थानिक गुन्ळे शाखेने या प्रकरणाचा उलगडा केला आहे. तक्रारदार धर्मेंद्र बयाराम आंबागडे (२८) रा.मानेवाडा नागपूर याचे तचे चारचाकी वाहन चोरीला गेल्याची तक्रार दवनीवाडा पोलिस ठाण्यात केली होती. या प्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी अपराध क्र.४४-२0२२ भादंवि कलम ३७९ अंतर्गत प्रकरण नोंद केले होते. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड करीत असतानाच शुक्रवारी (ता.२५) त्यांना तक्रारदार आंबागडे हा स्वत: चारचाकी वाहन लपवून चोरीचा बनाव करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहिती आधारे पथक नागपूरला गेले असता. आंबागडे मिळून आला. पथकाने विचारपूस केली असता तो खोटे बोलत असल्याचा पोलिसांना संशय आला. यावर पोलिसांनी आपल्या पध्दतीने विचारपूस केली असता त्याने वाहन विम्यासाठी चारचाकी वाहन चोरीला गेल्याचा बनाव केल्याचे कबूल केले. तसेच लपवून ठेवलेले चारचाकी वाहन पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी वाहन जप्त केले असून व आंबागडे याला ताब्यात घेतले आहे.