
साकोली-ग्रामपंचायतीच्या नियोजित सभेत ग्रामसेवक दारुच्या नशेत खुर्चीवरच लोळल्याचा धक्कादायक प्रकार साकोली तालुक्यातील विरसी ग्रामपंचायतीमध्ये सोमवारी घडला. सभेत ग्रामसेवक दारुच्या नशेत बेशुद्ध झाल्याने नियोजित सभा होऊ शकली नाही. या प्रकाराची तक्र ार पोलिसांसह वरिष्ठांकडे करण्यात आली आहे.
साकोलीपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रामपंचायत विरशी येथे सोमवारी ११ वाजता सर्व ग्रामपंचायत पदाधिकार्यांची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये ग्रामसेवक हेमंत पब्बेवार चक्क दारू पिऊन आले. ते दारुच्या नशेत इतके तर्र होते की खुर्चीवर बसल्याबसल्या लोळू लागले. त्यातच ते बेशुद्ध झाले. ग्रामपंचायतीच्या महिला आणि पुरुष सदस्यांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते उठूही शकत नव्हते. परिणामी, पदाधिकार्यांची सभा होऊ शकली नाही. त्यामुळे सभा रद्द करावी लागली.
त्यानंतर सर्व ग्रामपंचायतच्या पदाधिकार्यांनी खंडविकास अधिकारी आणि पोलीस स्टेशनला अधिकार्यांना भेटून घटनेची माहिती दिली. घटनेचे व्हिडिओ आणि फोटो वायरल झाले आहेत. सरपंच लीलाधर सोनवाणे, उपसरपंच नंदलाल राऊत, सदस्य रजनी दुर्गेश राऊत, माधुरी रेशीम लांजेवार, सरिता गहाने, पफुलता कोटांगले, वर्षा कापगते, भगवान लांजेवार, बाबुदास पंधरे यांनी लेखी स्वरूपाची तक्रार वरिष्ठांना दिली आहे. या सर्व घटनेचे छायाचित्र खुद्द उपस्थित पदाधिकार्यांनी काढले. दारुड्या ग्रामसेवकाची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.




