गुन्हे शाखा व सायबर सेलचे मोठे यश; संशयित आरोपी पोलिसांच्या रडारवर
चंद्रपूर- ४ एप्रिलला भद्रावती येथे तेलवसा मार्गावरील मक्रोन शाळेच्या मागील परिसरात ओसाड शेतात एका २२ वर्षीय युवतीचा शीर नसलेला मृतदेह आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. घटनस्थळावरून प्राप्त पुराव्यांवरून सदर युवतीची हत्या झाल्याचे उघड होते. मात्र, हत्या झालेल्या युवतीची ओळख पटू नये म्हणून त्या क्रूरकम्र्यांनी चक्क युवतीचे शीर कापून नेले होते. एवढय़ावरच समाधान झाले नसल्याने त्या युवतीला निर्वस्त्र करून तिचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. पोलिस स्टेशन भद्रावती येथे अज्ञात इसमांविरुद्ध अपराध क्रमांक १४१/२0२२ कलम ३0२, २0१ भादंविचा गुन्हा नोंदविण्यात येऊन तपास सुरू करण्यात आला होता. अखेर तपासाला यश प्राप्त झाले असून पोलिसांना तरुणीची ओळख पटविण्यात यश मिळाले असून पोलिसांना काही संशियत लोकांची माहिती प्राप्त झाल्याचे सूत्रांकडून कळले असून आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत.
निर्घृण हत्या करून मयतेची ओळख पटू नये, यासाठी शीर कापून युवतीचा नग्न मृतदेह फेकून पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकण्याचा गुन्हेगारांनी केलेला प्रयत्न नियोजनबद्ध असल्याचे तसेच गुन्हेगार हे थंड रक्ताचे असल्याचे लक्षात येत होते. सोबतच ते सराईत असावेत, असेही जाणवत होते. मात्र घटनेची माहिती कळताच चंद्रपूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन मृतदेहासह परिसराची पाहणी केली. हत्या करणार्याने गुन्ह्याचे पुरावे/खुणा/ निशानी सोडली नसल्याने सदर मृत तरुणीची ओळख पटविणे, हे मोठे आव्हान होते. स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व अधिकारी व पथक तसेच सायबर सेलमधील सायबर एक्सपर्ट यांच्या मार्फतीने मृत महिलेच्या शरीरावरील खुणा, मृतदेहाजवळ मिळालेल्या तिच्या वापराच्या वस्तू इत्यादी शोधपत्रिका तयार करून शोध घेण्यात आला. तसेच चंद्रपूर व बाजूच्या सर्व जिल्ह्य़ातून मागील काही दिवसांत या वयाच्या हरवलेल्या/पळून गेलेल्या मुलींच्या माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, कोणत्याही मुलीच्या हरवल्याची तक्रार प्राप्त झाली नाही. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल यांनी तांत्रिक तपास केला. त्यामध्ये पोलिसांना यश आले.
गोपनीय माहितीदाराकडून सदर महिलेची ओळख पटविण्यात आली. तिचा मोबाईल क्रमांक प्राप्त करण्यात आला. त्यावरून तिच्या राहते घराचा रामटेक जिल्हा नागपूर येथील पत्ता प्राप्त झाला. त्यावरून तिची मोठी बहीण हिच्याशी संपर्क साधून ओळख पटविण्याची खात्री करण्यात आली. तिच्या बहिणीने तिच्या शरीरावरील वर्ण व वापरातील वस्तू पाहून मृत महिला ही तिची बहीण असल्याची खात्री केली. मयत युवती ही स्वतंत्र राहत असल्याने ती बेपत्ता असल्याचे अथवा तिच्यासोबत कुठलीही अप्रिय घटना घडली असल्याची कुटुंबीयांना संशय आला नसल्याने पोलिसांना कुठलीही तक्रार देण्यात आली नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. सदर खुनातील आरोपी शोधण्याचे स्थानिक गुन्हे शाखा तसेच भद्रावती पोलिस स्टेशन, सायबर सेलचे विविध पथक पोलिस अधीक्षक अरविंद साळवे व अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात तपास करीत आहेत.
या प्रकरणी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, लवकरच या आव्हानात्मक गुन्ह्याचा पदार्फाश होणार, अशी माहिती आहे. सदर युवतीचा एका ठिकाणी खून करीत तिचे शीर कापण्यात आले, नंतर त्या युवतीचा मृतदेह भद्रावती येथे टाकून आरोपी पसार झाले, अशी माहिती आहे. मयत मृतदेहाची ओळख पटविण्याची कामगिरी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सपोनि जितेंद्र बोबडे, सपोनि संदीप कापडे, पोउपनि अतुल कावळे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार व सायबर सेलचे तज्ज्ञ मुजावर अली, वैभव पत्तीवार, राहुल पोंदे, भास्कर चिंचवलकर, संतोष पानघाटे व उमेश रोडे यांनी केली.