रानडुक्कर शिकारप्रकरणी तिघांना अटक

0
37

गडचिरोली -वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणार्‍या इंदाळा (पारडी) गाव परिसरात रानडुक्कराची शिकार केल्या प्रकरणी वनविभागाने तिघांना अटक केली आहे. मानुस पुडो, रमेश कुडो व ऋषिदेव मट्टामी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर यातील सनकू पडो हा पळून जाण्यात यशस्वी झाला. अटकेतील आरोपीमध्ये एक आत्मसर्मपित नक्षल्याचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार जिल्हा स्थहापासून जवळच असलेल्या इंदाळा पारडी रानटी डुकराची शिकार झाल्याची गुप्त माहिती वनविभागाला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे सोमवारी रात्रीच्या सुमारास इंदाळा परिसरात वनकर्मचार्‍यांने शोध मोहीम राबविण्यात आली. यादरम्यान चार व्यक्ती संशयास्पद स्थितीत दृष्टीस पडले. वनकर्मचार्‍यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता यातील एक आरोपी पसार झाला. यावेळी तीन आरोपींकडून रानटी डुकराचे मांस व साहित्य जप्त करण्यात आली. सोमवारी रात्रीच्या सुमारास मासे पकडण्यासाठी जात असताना चंद्रपूर मार्गावर रानटी डुकर मृत अवस्थेत आढळून आल्याची माहिती आरोपींनी दिली. सदर कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम आणि सहकार्‍यांनी केली.