गोंदिया,दि.26ः जिल्ह्यात घरफोडी व दुचाकीच्या घटनात वाढ होत चालली आहे. यावर आळा घालण्यासाठी गोंदिया पोलिसांनी कंबर कसून गस्त वाढविली आहे. २४ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मुर्री परिसरात एका युवकाकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर केलेल्या तपासकार्यात पोलिसांना अट्टल चोरट्यासह दोघांना अटक करण्यात यश आले आहे. आरोपींकडून ४ मोटारसायकल, विद्युत मोटारपंप, बॅटरी, असा एकूण ३ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विजय टेकचंद शरणागत असे अटक करण्यात आलेल्या अट्टल चोरट्याचे नाव असून, दुसरा आरोपी विधी संघर्षित आहे.
जिल्ह्यात दुचाकी चोरी, घरफोडी आदिंच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. वाढते चोरीचे प्रमाण लक्षात घेवून यावर आळा घालण्यासाठी गोंदिया पोलिसांनी पेट्रोलिंग सुरू केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली २४ मे रोजी गस्त घालत असताना गुप्त सुत्राकडून र्मुी येथील एका युवकाकडे चोरीची मोटारसायकल असल्याचे माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर नंगपुरा र्मुी येथील विजय टेकचंद शरणागत याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान त्याच्याजवळ असलेल्या दुचाकीची माहिती विचारली असता त्याने टाळाटाळ केले. यावरून त्याची कसून चौकशी केली असता सदर मोटारसायकल एका विधी संघर्षित आरोपीसोबत चोरी केल्याची कबूल केले. ही मोटारसायकल नवेगाव/पांढराबोडी येथून घरासमोर तसेच इतर दोन मोटारसायकल राजनांदगाव व एक मोटारसायकल तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथून चोरी केल्याचे सांगितले. एवढेच नव्हेतर जब्बारटोला, निलज, पांढराबोडी, तेढवा आदी गावातील शेतशिवारात सिंचनासाठी लावलेले ५ समरसिबल मोटारपंप त्याचप्रमाणे डोंगरगाव येथून ट्रॅक्टरच्या तीन बॅटर्या चोरी केल्याची कबुली दिली. यावरून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपीकडून ४ मोटारसायकल, ५ समरसिबल पंप, तीन बॅटरी असा ३ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना गोंदिया ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात उपपोनि मनोज उघडे, पोहवा राजेंद्र मिश्रा,मुरली पांडे, अर्जुन कावळे, भुवनलाल देशमुख, महेश मेहर, विजय मानकर, संतोष केदार, लक्ष्मण बंजार यांनी केली.