नागपूर-शहरातील अंबाझरी तलावात एका वकिलाने उडी घेत आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. प्रवीण केशवराव तपासे (वय ५४, रा. प्लॉट नंबर ४५७, चंदननगर) असे मृतक वकिलाचे नाव आहे. प्रवीण तपासे हे काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगितले जाते.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये असल्यामुळे ते कोणाशीच बोलत नव्हते. याशिवाय त्यांच्यावर मोठे कर्जही असल्याचे बोलले जाते. वकिली जास्त चालत नसल्यामुळे डिप्रेशनमध्ये येऊन त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. २६ मे २0२२ रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तपासे हे जिल्हा न्यायालय परिसरात ते नोटरी आणि कोर्टाची कामे करायचे. कोरोना काळात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची तब्येत सातत्याने बिघडायची. त्यातून त्यांच्यावर मानसिक तणाव निर्माण झाला होता. याशिवाय त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याने आर्थिक ताण येत होता. दररोज सांयकाळी घरातून निघून ते रात्री साडेनऊला घरी परत यायचे. त्यानुसार बुधवारी सायंकाळी ते नेहमीप्रमाणे फिरायला निघाले. मात्र, रात्री बराच उशीर झाल्यावरही ते परत आले नाही. त्यामुळे परिवारातील सदस्यांनी शोधाशोध सुरू केली. गुरुवारी सकाळी नऊ वाजता त्यांना अंबाझरी पोलिस ठाण्यातून फोनवर याबाबत माहिती देण्यात आली. प्रवीण तपासे यांना दोन मुले असून, त्यापैकी एक मुलगा तिसरीत तर मुलगी अभियांत्रिकीला शिकते. पोलिसांनी प्राथमिक तपासात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.