धावणार्‍या रेल्वे गाड्यांमध्ये चोरी करणारा अट्टल चोर जेरबंद

0
24

रेल्वे स्टेशन बल्लारशाह, चंद्रपूर ते रेल्वे वर्धा, बडनेरा दरम्यान करत होता चोरी, ट्वीटरवर व्हिडीओ बघा 

नागपूर : रेल्वे स्टेशन बल्लारशाह, चंद्रपूर ते रेल्वे वर्धा, बडनेरा दरम्यान धावणार्‍या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाश्यांच्या बॅग व मोबाइल चोरी करणार्‍या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल एकूण 1 लाख 28 हजार 945 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नागपूर लोहमार्ग पोलीस जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील रेल्वे स्टेशन बल्लारशाह, वर्धा, बडनेरा स्टेशन दरम्यान धावणार्‍या रेल्वे गाड्यांतील प्रवाशांच्या बॅग, मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. त्यामुळे लोहमार्ग नागपूरचे पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर यांना दाखल गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे यांच्यासह एक पथक तयार करण्यात आले होते.

28 मे 2022 रोजी गुप्त बातमीदारातर्फे माहिती प्राप्त झाली की, अनिकेत दादाराव कुमरे (वय 22) रा. मारेगाव जि. यवतमाळ ह.मु. फिरस्ता वरोरा हा अट्टल गुन्हेगार असून रेल्वे गाड्यांमध्ये चोर्‍या करतो. तो बल्लारशाह रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने त्याला सापळा रचून मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याची रेल्वे गाड्यांमधील चोर्‍यांबाबत चौकशी केली असता, त्याने रेल्वे स्टेशन बल्लारशाह ते बडनेरा दरम्यान रेल्वे प्रवाश्यांच्या बॅग व मोबाइल चोरी केल्याचे सांगितले.

त्याच्याविरुद्ध वर्धा पोलीस ठाण्यात कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून एक लॅपटॉप व इतर माल असा एकूण 44 हजार रूपयांचा माल, तसेच बडनेरा रेल्वे पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम 379 अन्वये दाखल गुन्ह्यातील एक रेडमी मोबाइल (किंमत 16 हजार रुपये) तसेच वेगवेगळ्या कंपनीचे महागडे 7 मोबाइल एकूण किंमत 68 हजार 945 रुपये असा एकूण 1 लाख 28 हजार 945 रूपयांचा मुद्देमाल आरोपीकडुन जप्त करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक वैशाली शिंदे, लोहमार्ग नागपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांच्या सूचनेवरून गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस हवालदार मानकर, पोलीस नाईक इंगळे, उजवणे, खोब्रागडे, पोलीस शिपाई त्रिवेदी, राऊत, रोशन अली व वाहन चालक सहायक पोलीस उपनिरीक्षक ठाकूर तसेच रेल्वे पोलीस स्टेशन वरदह दूरक्षेत्र बल्लारशाह येथील पोलीस शिपाई भांगे, निकोडे तसेच सायबर सेल लोहमार्ग नागपूरचे सहायक पोलीस निरीक्षक कविकांत चौधरी व पोलीस शिपाई अभिषेक ठाकरे यांनी केली.