पवनी-आईला शिवीगाळ केल्यावरुन झालेल्या वादात मोठय़ा भावाने अंगणात झोपलेल्या लहान भावाचा डोक्यावर कुर्हाडीने वार करुन खून केला. पवनी तालुक्यातील बेटाळा येथे रविवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पवनी पोलिसांनी आरोपी मोठय़ा भावाला अटक केली.
शिशुपाल पांडुरंग देशमुख (३५) रा.बेटाळा ता.पवनी असे मृताचे नाव आहे तर तेजराम पांडुरंग देशमुख (४0) असे आरोपी मोठय़ा भावाचे नाव आहे. आईच्या मालकी शेती विकण्यावरुन दोन भावांत नेहमीच भांडण होत होते. रविवारी शिशुपाल आणि तेजराम दोघेही भाऊ पवनी येथे बाजारासाठी आले होते.
भाजीपाला खरेदी करुन सोबतच दोघांनी दारु प्राशन केली आणि गावाकडे निघाले. शिशुपाल याने शेती विकून पैशासाठी आईसोबत भांडण केले होते. गावी जाताना मोठय़ा भावाने आईला शिवीगाळ का करतोस? असा जाब विचारला. त्यावरुन वाद झाला. रात्री शिशुपाल अंगणातील चटईवर झोपला होता. त्यावेळी दारुच्या नशेत असलेल्या तेजरामने रात्री १0 वाजताच्या दरम्यान कुर्हाडीने शिशुपालच्या डोक्यावर व मानेवार वार केले. त्यात तो जागीच मरण पावला. घटनेची माहिती मिळताच पवनी पोलिसांनी बेटाळा गाठून आरोपी तेजराम याला ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक तपास पवनीचे ठाणेदार जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आशिष चिलांगे करीत आहेत.
|