
सावली-शेतातील कटींग केलेले सागवान लाकूड वाहतूक करण्याकरिता लागणारा निर्गत परवाना (टीपी) देण्याच्या कामाकरिता १ लाख रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना सावली वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या उपक्षेत्र पाथरी येथील वनपाल वासुदेव लहानू कोडापे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई ३ जून रोजी करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार यांनी गावातील शेतकरी यांच्या शेतातील कटिंग केलेले सागवान लाकूड वाहतूक करण्याकरिता लागणारा ठेकेदारीकरिता निर्गत परवाना (टीपी) देण्याच्या कामाकरिता उपक्षेत्र पाथरी येथील वनपाल कोडापे यांच्याकडे मागणी केली. वनपालांनी निर्गत परवाना देण्याच्या कामाकरिता १ लाख २ हजार रुपयांच्या लाच रकमेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा करून ३ जून रोजी सापळा रचला. तडजोडीअंती वनपालाने १ लाख रुपयांची लाच स्वत: स्वीकारल्याने त्यांच्या शासकीय निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस उपायुक्त तथा पोलिस अधीक्षक लाप्रवि नागपूरचे राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक मधुकर गीते, तसेच उपअधिक्षक लाप्रवि चंद्रपूर अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पा भरडे तसेच कार्यालयीन स्टॉफ सफौ रमेश दुपारे, नापोकॉ नरेश नन्नावरे, पो.अ. रविकुमार ढेंगळे, वैभव गाडगे व चालक सतीश सिडाम यांनी केली.