3 कोटी 77 लाख 98 हजार 600 रुपयाचा अपहारप्रकरणी गुन्हा दाखल
गोंदिया,दि.10ः गोंदिया जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून शासकीय योजनेंतर्गत धान खरेदी केंद्र सुरु असून गेल्या काहीवर्षापुर्वी झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने गोरेगाव येथील नेहरु सहकारी धानगिरणी संस्थेच्या धान खरेदी केंद्रांतर्गतच्या लेखापरिक्षणात सुमारे 3 कोटी 77 लाख 98 हजार 600 रुपयाचा अपहार झाल्याचे जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग 1 यांनी आपल्या तपासणी अहवालात नोंदवले आहे.त्या तपासणी अहवालाच्या आधारावर गोरेगाव पोलिस ठाणे येथे भांदवीच्या कलम 408,409,406,467,468,71 व 34 अंतर्गत आज 10 जुन रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.या तक्रारीत गोरेगाव तालुक्यातील नेहरु सहकारी धानगिरणीच्या दवडीपार व कवलेवाडा येथील धान खरेदी केंद्राचा उल्लेख करण्यात आला असून 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2020 या दरम्यान घोळ झाल्याचे म्हटले आहे.जिल्हा लेखा परीक्षक वर्ग 1 च्या अहवालानुसार 3 कोटी 77 लाख 98 हजार 600/- इतक्या रक्कमेचा अपहार केल्याचे म्हटले आहे. यासंदरर्भात गोरेगाव पोलीस ठाण्यात सहकार आयुक्त कार्यालयाने नेमलेल्या चौकशी समितीने नोंदवलेल्या तक्रारीवर गुन्हा दाखल केलेला आहे.