नक्षल्यांनी जाळली सहा वाहने

0
96

गडचिरोली-जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यात नक्षल्यांच्या हिंसक कारवाया सुरूच असून बुधवारच्या रात्री या तालुक्यातील नारगुंडा पोलिस मदत केंद्राअंतर्गत येणार्‍या विसामुंडी गावात नक्षल्यांनी सहा वाहनांना आग लावली. यामध्ये ठेकेदाराचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावण निर्माण झाले आहे.
यापूर्वीही नक्षल्यांनी या तालुक्यात विविध गावामध्ये वाहनांना आग लावल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे या तालुक्यात नक्षल्यांच्या हिंसक कारवाया सुरूच असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारच्या सकाळी ही घटना उघडकीस आल्याने भामरागड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिस विभागाने या घटनेला दुजोरा दिला आहे.
विसामुंडी गावाजवळील नाल्यावर पुलाचे निर्माणकार्य सुरू आहे. बुधवारच्या रात्री काम संपल्यानंतर सर्व वाहने विसामुंडी गावात ठेवण्यात आले होते. दरम्यान, रात्रीच्या सुमारास सशस्त्र नक्षलवादी गावात पोहोचून तब्बल सहा वाहनांना आग लावली. यामध्ये १ पोकलॅन्ड मशिन, १ जेसीबी, २ ट्रॅक्टरसह १ दुचाकी वाहनाचा समावेश आहे.
या घटनेमुळे संबंधित ठेकेदाराचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे. तसेच नक्षल्यांनी अन्य साहित्यांनादेखील आग लावल्याची माहिती प्राप्त झाली आहे.