
नागपूर : पाटणसावंगी येथील बाजार चौक परिसरात दोन चिमुकल्या मुलींचा संश्यास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. साक्षी फुलसिंग मीना (वय 6) व राधिका फुलसिंग मीना (वय 3) असे मृतक मुलींचे नाव आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन महिन्यापासून मुलींची आई माधुरी फुलसिंग मीना ही पूनम, साक्षी व राधिका या तीन मुलीसह येथील बाजार चौक परिसरात राहणाऱ्या आई गंगाबाई भैयाजी काळे यांच्या घरी राहत होती. आज सकाळी साक्षी व राधिका यांची तब्येत ठीक नसल्याचे सांगितले. यानंतर आई व आजीने दोघींना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. दोघींना तपासले असता राधिकाचा आधीच मृत्यू झाला होता. तर साक्षी ही अतीगंभीर दिसल्याने तिला नागपुरातील मेयो हॉस्पिटलसाठी रवाना केले पण तिचाही रस्त्यात मृत्यू झाला.दोन चिमुकल्या बहिणींचा असा अचानक व संशयित मृत्यू झाल्याचे पोलिसांना (Police) समजताच चौकशीसाठी घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अजय चांदखेडे, सावनेरचे पोलीस निरीक्षक मारुती मुळूक, सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर व दिलीप नागवे पोलीस ताफ्यासह दाखल झाले. संशयित घटना असल्याने चाचणीसाठी रात्रीचे जेवणाचे नमुने घेतले व दोन्ही मृत मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी मेयो हॉस्पिटल नागपूरला रवाना केले. पुढील पोलीस तपास सुरु आहे.