तिरोडा पंचायत समितीचे दोन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

0
175

तिरोडा, दि.8 : वैद्यकीय रजेचे बील मंजूर करवून देणे व वेतन काढून देण्यासाठी 17 हजाराची मागणी करणे तिरोडा पंचायत समितीच्या दोन अधिकार्‍यांना चांगलेच महागात पडले. सदर दोन्ही अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले असून त्यांच्याविरुद्ध तिरोडा पोलीस ठाण्यात लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये तिरोडा पंचायत समितीचे सहायक प्रशासन अधिकारी प्रदीप बंसोड रा. कुंभारे लानजवळ तिरोडा व तिरोडा पंसचे वरिष्ठ सहायक प्रमोद सदाशिव मेश्राम (वय 49) रा. जवाहर कॉलनी, गोंदिया यांचा समावेश आहे.

सविस्तर असे की, तक्रारदार हे कृषी विभागात विस्तार अधिकारी पदावर कार्यरत आहेत. यातील आरोपी सहायक प्रशासन अधिकारी प्रदीप बंसोड याने तक्रारदाराची वैद्यकीय रजेची फाईल मंजूर करवून देणे व वेतन काढून देण्याकरिता दूसरा आरोपी वरिष्ठ सहायक प्रमोद सदाशिव मेश्राम याच्याकरिता 10 हजार रुपये व स्वतःकरिता 7 हजार रुपये अशा एकूण 17 हजार रुपये लाच रकमेची मागणी केली. त्यावेळी तक्रारदाराने नाइलाजाने होकार दिला, मात्र त्यांना 17 हजार रुपये लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी दोन्ही अधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याकरिता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार नोंदविली.

सदर प्रकरणात आरोपी बंसोड व आरोपी मेश्राम यांची लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यात आरोपींनी तक्रारदाराकडे पंचासमक्ष लाच रकमेची मागणी केली व ती लाच लाच रक्कम आरोपी अधिकारी बंसोड याच्याकडे देण्याचे सांगून लाच रक्कम प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर लगेच आरोपींना संशय आल्याने आरोपी अधिकारी बंसोड याने तक्रारदाराकडून लाच रक्कम स्वीकारण्यास नकार दिला.

7 सप्टेंबर 2022 रोजी दूसरा आरोपी वरिष्ठ सहायक प्रदीप मेश्राम याला ताब्यात घेण्यात आले असून पहिला आरोपी अधिकारी बंसोड याचा शोध सुरू आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध तिरोडा पोलीस ठाण्यात कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक मधुकर गीते, लाप्रवि गोंदियाचे पोलीस उपअधीक्षक पुरुषोत्तम अहिरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अतुल तवाडे, सहायक फौजदार विजय खोब्रागडे, सहायक फौजदार चंद्रकांत करपे, पोलीस हवालदार संजय बोहरे, मिल्कीराम पटले, नापोशि राजेंद्र बिसेन, मागेश कहालकर, अशोक कापसे, चालक नापोशि दीपक बाटबर्वे सर्व लाप्रवि गोंदिया यांनी केली.