चारचाकीने चिरडून ग्राप परिचराची दवनीवाड्यात हत्या

0
168

गोंदिया– जुन्या भांडणाच्या वैमनस्यातून गावातील ग्रामपंचायत परिचराची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. संबंधित घटना ही गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यांतर्गत येत असलेल्या दवनीवाडा गावात घडली आहे.या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. आरोपीने 51 वर्षीय परिचर यशवंत मेंढे यांना धडक दिली. त्यानंतर गाडी मागे-पुढे करत त्यांना चिरडलं.

या हल्ल्यात मेंढे यांचं दुर्देवी निधन झालं आहे. यशवंत मेंढे हे आज आपलं काम आटोपून घरी जात होते. या दरम्यान ग्रामपंचायत गेटसमोर 38 वर्षीय आरोपी प्रवीण नेवारे याने आपली टाटा सुमो गाडीने यशवंत मेंढे यांना जोराची धडक दिली. आरोपी तेवढ्यावर थांबला नाही.

त्याने गाडी पुन्हा मागेपुढे करत मेंढे यांना गाडीखालून अक्षरश: चिरडलं. एमएच 34 एए 9145 असा टाटा सुमो या गाडीचा नंबर होता. आरोपी त्या गाडीने हल्ला करुन पळून गेला. यशवंत मेंढे यांना रस्त्यावर धारातीर्थ पडलेलं पाहून काही नागरिकांना धक्का बसला.

त्यांनी तातडीने यशवंत यांना उपचारासाठी गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल केलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी घटनेची माहिती घेतली तेव्हा संबंधित घटना ही पूर्व वैमनस्यातून झाल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी याप्रकरणी कलम 307, 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे आरोपी प्रवीण नेवारे याने हत्या केल्यानंतर दवणीवडा पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं आहेत. दवणीवडा पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.