रामनगर पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांना उधाण,एसीबीत अडकलेले कर्मचाऱ्यांचा बोलबाला

0
72

गोंदिया,दि.16– गोंदिया शहराला लागून असलेल्या परिसराला दोन पोलीस ठाणे परिसरात विभागण्यात आले आहे.शहर पोलीस ठाणेनंतर सर्वाधिक महत्वाचे पोलीस ठाणे रामनगर पोलीस ठाणे आहे.तर रामनगर पोलीस ठाणे परिसर हा अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या परिसरात असल्याने राजकीय हालचालीही तेवढ्याच असतात.रेल्वेस्टेशनचा परिसरही याच भागात असल्याने परिसरात मोठ्याने अवैध धंद्यांना उधाण आले आहे.

रामनगर पोलीस ठाण्यात लाचलूचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेले काही कर्मचारी नियुक्तीवर असून एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या कार्यकारी पदाचा काम देता येत नाही.मात्र याठिकाणी अकार्यकारी काम देण्याएैवजी कार्यकारी काम दिल्याचे बोलले जात आहे.विशेष म्हणजे काही दिवसापुर्वीच याच पोलीस ठाण्यात एसीबीची धाड पडणार होती.मात्र संबधित पोलीसाला याची कुणकुण लागताच त्या पोलीस शिपायाच्या बचावासाठी पोलीस ठाणे कामाला लागल्याने तो सापळा एसीबी विभागाला यशस्वी करता आला नव्हता.त्यानंतरही त्या पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी आजही वसुली करीत असल्याचे अनेक व्यवसायीक आपले नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर पिडीत स्वरात सांगतात .पोलीसांकडे तक्रार करणार्यांचेही नांव उघड होत असल्याने नागरिक पुढे येण्यास घाबरत आहे. या अवैध धंद्यांचा त्रास स्थानिक नागरिकांना होत असून,या अवैध धंद्यांवर कारवाई करुन आळा घालण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.रामनगर पोलीस ठाणे परिसरातील काही निवडक पानटपरी,चहानास्त्याची दुकाने,कॅरमच्या नावावर बेकायदेशीर दारू विक्री,मटका, जुगार अड्डे सर्वांच्या नजरेस पडणारे अवैधधंद्यांकडे पोलिसांसह सर्वच प्रशासकीय यंत्रणा सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे.या ठिकाणी नेहमीच शहरातील मोठ्या गुन्हेगारी स्वरुपाच्या व्यक्तींचा कायम वावर असतो. परंतु याकडे पोलीस सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे.हद्दीतील जुगार अड्डावरील एखादी कारवाई सोडली तर विशेषतः कोणतीही मोठी कारवाई काही दिवसांपासून झालेली नाही.अवैध धंदेवाल्यांवर कारवाई केली जात नसल्याने अवैध धंद्यांना उधाण आले असेल. परंतु याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे.

रेल्वे स्टेशनच्या मोकळ्या जागेतील परिसरात व पानटपर्यांच्या आडून मोठ्याप्रमाणात अवैधरित्या दारु पिणार्यांची सोय होत असल्याचे चित्र बघावयास मिळते.त्यातच रेल्वेस्टेशन शेजारी असलेल्या रामनगर पोलिसांच्या चौकीचा परिसरच अतिक्रमणाच्या वेढ्यात असून त्या मुख्य मार्गावर सर्वच दुकानदारांनी किमान 5 फुुटापर्यंत दुकानाचे साहित्य रस्त्यावर आणल्याने वाहतुकीला खोळंबा दररोज होतो.मात्र रामनगर पोलीस ठाण्याचे वाहतुक विभागातील पोलीसच नव्हे तर अधिकारीही याकडे मूग गिळून बसल्याने या दुकानदारांनाच पोलीस खाते घाबरते की काय अशी अवस्था या रस्त्याने ये जा करतांना दिसून येते.आधीच अरुंद रस्ता त्यातच दुकानदारांनी रस्त्यापर्यंत आणलेले दुकानाचे साहित्य,आँटोचालकांनी रस्त्यावरच आपले मांडलेले बस्तान हे का दिसत नाही.त्यातच रात्रीच्यावेळी याच भागातील काही निवडक दुकानाच्या आत वाईनशाँपमधून दारु घेऊन आलेले मद्यशौकीन बिनधास्त दारु प्राशन करीत असल्याचे चित्र सर्वसामान्यांना नित्याचेच झाले आहे.या पोलीस ठाणे परिसराला लागून असलेल्या काही भागातच दारु, मटका, जुगार अवैध खेळले जात असल्याची चर्चा त्या परिसरात एैकावयास मिळते.मात्र आजपर्यंत त्याठिकाणी कारवाई झाल्याचे कधीच एैकावयास मिळालेले नाही.

अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले व्यक्ती, दारुडे येथील नागरिक व महिलांना त्रास देण्याचे काम करीत आहे. पुढे त्रास वाढू नये म्हणून तक्रारदार देखील पोलीसांकडे जात नाही.तर एखाद्या अवैध धंद्याची तक्रार जरी केली तर, त्यांचे नांव उघड होऊन गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून तक्रारदारांना त्रास देण्याचे काम सुरु होते. यामुळे पोलीस ठाण्यात तक्रारी देखील दाखल केल्या जात नाही आहे.याबाबत पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी लक्ष घालून पोलीस ठाणे हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद करण्यासाठी उपाययोजना कराव्या अशा सूर रामनगर पोलीस ठाणे परिसरातील नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.

रामनगर पोलिस ठाण्याची हद्द मोठी असून, गुन्हेगारीच्या घटना येथे मोठ्या प्रमाणात घडत असतात. गुन्ह्यांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान या ठाण्यातील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसमोर असते. सोबतच मोहल्ला कमिट्यामार्फंत  दारूविक्रीवर आळा घालण्याचीही जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर असते. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपासाची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्याचे काम व्हायला हवे. नवीन गुन्ह्यांचा तपास करणे, दारूतस्करांच्या मुसक्‍या आवळणे यासर्व कामांवर मोठा परिणाम झाला असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे. प्रत्येक प्रभागात अवैध दारूविक्रेते आहेत. या दारूविक्रेत्यांवर आळा घालण्याची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकारी, डीबी पथकाची असते. मात्र रामनगर ठाणे हद्दीतील अतिक्रमणधारक,अवैध विक्रेते,अवैध व्यवसायिकांना आता मोकळे रान झाले आहे.