वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार

0
23

अमरावती –नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या द्रूतगती वळण मार्गावर भरधाव वेगातील वाहनाच्या धडकेने एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. रविवारी पहाटे हॉटेल गौरी इन नजीक ही घटना घडली.पहाटे फिरणाऱ्या लोकांना बिबट्या रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत आढळून आला. शहरात द्रूतगती वळण मार्गावर बिबट्याचा वावर यापुर्वीही आढळून आला आहे. याशिवाय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसर आणि लगतच्या जंगलात बिबट्याचे वास्तव्य आहे. अर्जून नगर परिसरातून हॉटेल गौरी इनच्या मागे असलेल्या श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या परिसरातून हा बिबट्या अचानक महामार्गावर आला. त्याचवेळी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनाची धडक बिबट्याला बसली.या धडकेने बिबट्या जागीच ठार झाला.मिनी बायपास मार्गावरील विभागीय आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानामागील परिसरात काही दिवसांपुर्वी बिबट्याचा वावर निदर्शनास आला होता. वन विभागाच्या वतीने या भागात बिबट्याला बंदिस्त करण्यासाठी पिंजरा ठेवण्यात आला होता. मात्र बिबट्याला पकडण्यात वनविभागाच्या पथकाला यश मिळाले नव्हते. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या परिसरातही बिबट्याचा शोध घेण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून वनविभागाच्या पथकांची गस्त सुरू आहे. नागरी वस्तीत‍ बिबट्याचे वास्तव्य आढळून आल्याने नागरिक देखील चिंतेत होते. वनविभागाचे पथक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी स्वत: गस्त घालून लोकांची भीती दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.