
तुमसर-बोनस दस्तावेजांचा वापर करून धान घोटाळा केल्याप्रकरणी तुमसर तालुक्यातील येरली येथील धान खरेदी केंद्र चालकांसह १0 जणांवर तुमसर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या केंद्रात तब्बल ८ कोटी ५६ लाख ९४ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पण्ण झाले आहे.
१ ऑक्टोबर २0२१ ते ३0 जून २0२२ या कालावधीत संत रविदास मागासवर्गीय सुशिक्षीत बेरोजगार सह संस्था र्मया. तुमसर या नावाने असलेल्या संस्थेमध्ये नितीन शालीक भोंडेकर रा. रविदास वॉर्ड तुमसर, संदीप प्रकाश भोंडेकर रा. आझाद वॉर्ड तुमसर, शैलेश राजकुमार तांडेकर रा. तुमसर, सुनील बसुदास तुरकाने रा. तुमसर, अजय सदानंद कनोजे रा. तुमसर, विनोदकुमार प्रेमदास झाडे रा. तुमसर, अभय प्रकाश रोडगे तुमसर, अश्विन अजय भोंडेकर रा. तुमसर, रवी मोतीलाल नरसुरे रा. तुमसर, अतुल प्रकाश चौबे यांनी संगणमत करून संस्थेच्या अंतर्गत येरली येथे धान खरेदी केंद्र तयार करून खरीप हंगाम २0२१ – २0२२ मध्ये प्रत्यक्ष धान खरेदी न करता धान खरेदी केल्याचे खोटे दस्तऐवज तयार करून शासनाची, जिल्हा मार्केटींग फेडरेशन कार्यालयाची व शेतकर्यांची फसवणूक केली. या संस्थेने २८ हजार ६१२.४४ क्विंटल धान रक्कम ८ कोटी ३२ लाख ६२ हजार २00 रुपये आणि २४ लाख ३२ हजार ५७ रुपयांचा बारदाना, असा एकूण ८ कोटी ५६ लाख ९४ हजार २५७ रुपयांचा अपहार केल्याचे दिसून आले. याप्रकरणी जिल्हा पणन अधिकारी भारतभुषण रमेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिस स्टेशन तुमसर येथे कलम ४0६,४0९, ४२0, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मीता राव यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर व सहायक पोलिस निरीक्षक नितीन मदनकर यांनी केली.