कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ठाणेदारासह दोघे निलंबित

0
20

मोहाडी- तालुक्यातील कांद्री येथे जनावरांची अवैध वाहतूक करणार्‍या वाहनावर तूफान दगडफेक करून वाहकाला गंभीर जखमी करणार्‍या आठ जणांना अटक करून मोहाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २३ नोव्हेंबरपयर्ंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याच प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत आंधळगावचे ठाणेदार सुरेश मट्टामी व एका कर्मचार्‍याना पोलिस अधीक्षकांनी निलंबित केल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.
कत्तलखान्यात अवैध जनावरे घेऊन जाणार्‍या वाहनावर मोहाडी तालुक्यातील कांद्री गावाजवळ ८ जणांनी तूफान दगडफेक केल्याने वाहक मोहम्मद उस्मान (३७ वर्ष ) रा. कामठी, जि. नागपूर हा गंभीर जखमी झाला असून सध्या तो अतिदक्षता विभागात दाखल आहे. या प्रकरणात शेख मोहसीन शेख नसिर (रा. कामठी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दगडफेक करणार्‍या शेखर बडवाईक याचेसह सात जणांवर भादंवि ३0७, ३४, १४३, १४७, १४८ आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम १३५ नुसार गुन्हा नोंदविला. गुरुवारी रात्री शेखर बडवाईक याला अटक करण्यात आली होती. शुक्रवारी आरोपी शेखर गुलाब बडवाईक याच्या माहितीवरून चंद्रशेखर सुखराम कारेमोरे (२८), विलास संपत गिरेपुंजे (३२), प्रज्वल प्रल्हाद जाधव (२२), प्रांजल सोमा बालपांडे (२४), नितीन केशवराव नागफासे (३0), कैलास रामदास खेवले (३२), श्रेयस राजेश गडपायले (१९) सर्व रा. कांद्री यांना अटक करण्यात आली. या सर्व आठ आरोपींना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी मोहाडी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता, पुढील तपासाकरिता पोलिसांच्या मागणीनुसार २३ नोव्हेंबरपयर्ंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. तर शुक्रवारी सायंकाळी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आंधळगावचे ठाणेदार सुरेश मट्टामी व एका कर्मचार्‍याला कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबित केले आहे. याच प्रकरणात आणखी काही पोलिसांवर कारवाईची शक्यता आहे.