25.8 C
Gondiā
Wednesday, August 26, 2026
Home गुन्हेवार्ता आमदार बच्चू कडू यांना दुचाकी स्वाराने उडविले:बच्चू कडू जखमी

आमदार बच्चू कडू यांना दुचाकी स्वाराने उडविले:बच्चू कडू जखमी

0
49

अमरावती दि ११
चांदूर बाजारचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बसत असताना भरधाव दुचाकीने त्यांना उडवले. त्यांच्या डोक्याला मार लागला असल्याने अमरावती शहरातील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. शहरातील कठोरा नाका परिसरातील आराधना चौकात हा अपघात बुधवारी सकाळी घडला. अपघाताची माहिती मिळताच प्रहारचे कार्यकर्ते तसेच त्यांच्या हितचिंतकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.

माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे एका कार्यक्रमाला जाण्याकरिता अमरावतीत आले होते. कठोरा नाक्यावरील आराधना चौकात एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बसण्याकरिता ते जात होते. दरम्यान भरधाव आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. यात ते रस्त्यावरील दुभाजकावर पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला तसेच पायाला मार लागल्याची माहिती आहे. त्यांना तातडीने येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच प्रहारचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे.