ट्रॅक्टर तीस फूट खोल चुलबंद नदीपात्रात कोसळला; एकाचा मृत्यू, तर दोन गंभीर

0
25

भंडारा : सावरगाव येथून कडधान्य घेऊन लाखांदूरकडे येत असलेला ट्रॅक्टर पुलावर अनियंत्रित होऊन थेट तीस फूट खोल चुलबंद नदीपात्रात कोसळला. या अपघातात एकाचा मृत्यू, तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज गुरुवारी २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजतादरम्यान घडली. अण्णा रामचंद्र पारधी (५०) असे मृताचे नाव असून, राधेश्याम मधुकर ढोरे (२३) व राष्ट्रपाल सावजी ठाकरे ( ५०) हे गंभीर जखमी असून, तिघेही सावरगाव येथील रहिवासी आहेत.

प्राप्त माहितीनुसार, ट्रॅक्टर सावरगाववरून कडधान्य घेऊन लाखांदूर येथे येण्यासाठी निघाला असता लाखांदूर येथील चुलबंद नदीच्या पुलावर येताच मागून भरधाव वेगाने टिप्पर आल्याने चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. यातच ट्रॅक्टरच्या दोन्ही मोठ्या चाकांना कॅचबिल लावले असल्याने टिप्परसोबत धडक तर होणार नाही या भीतीने ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर बाजूला घेण्याचा प्रयत्नात असतानाच भरधाव वेगात असलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह पुलाचे तीन लोखंडी कठडे तोडून ३० फूट खोल चुलबंद नदीत कोसळले.घटनास्थळावरून अपघातग्रस्ताचे गाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असल्याने अपघाताची माहिती मिळताच असंख्य नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात माहिती देऊन पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावली व त्यात तिघांनाही तात्काळ लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र यात उपचारादरम्यान अण्णा रामचंद्र पारधी यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तर अन्य दोनजण गंभीररित्या जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे हलविण्यात आले आहे. यातील राधेश्याम ढोरे यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या चुलबंद नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. बांबूचा जुगाड तोडून ट्रॅक्टर खाली कोसळल्याने ट्रॅक्टरला मोठे नुकसान झाले आहे. लाखांदूर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.