मुंबई– एका महिला पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घरातून दूर्गंध येऊ लागल्याने ही बाब उघडकीस आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शीतल एडगे (35) असे मृत महिलेचे नाव आहे. मागील दीड महिन्यापासून आजारपणामुळे ती सुटीवर होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतलने मुंबईच्या कामगार नगर येथे भाड्याचे घर घेतले होते. बुधवारी संध्याकाळी तिच्या शेजाऱ्यांनी फोन करून तिच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे सांगितले.
ही माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, दरवाजा आतून बंद असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावून दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी शीतलचा मृतदेह स्वयंपाकघरात आढळून आला. शीतलचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयास्पद काही नाही
ANI ने यासंदर्भातलं वृत्त दिले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे असे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नाही. झोन ६ चे DCP हेमराज राजपूत यांनी हे ठिकाणी दाखल झाले होते. आम्ही या प्रकरणी पुढील तपास करत आहोत असेही राजपूत म्हणाले.





