देवरी-आमगाव या मुख्य मार्गापासून २५० मीटर अंतरावरील घटना
देवरी,दि.२९- देवरी पासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या वडेगाव शिवारात विद्युत प्रवाह असलेल्या तारांच्या संपर्कात आल्याने एक बछडा आणि दोन प्रौढ अशी तिन बिबटांचा मृत्यू झाल्याची घटना मृत्यू झाल्याची घटना काल सोमवारी (दि.२८) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास उजेडात आली. देवरी वनविभाग या प्रकरणाची चौकशी करीत असून चार संशयितांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहिती प्रमाणे, वडेगाव परिसरातील काही गावातील लोक वन्य प्राण्यांची शिकार करीत असतात. या शिकारी आपले सावज टिपण्यासाठी या भागातून गेलेल्या उच्चदाब वाहिनीवर आकडे टाकून तारामधून विद्युत प्रवाहित करीत असतात. हा यांचा नेहमीचाच उद्योग असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या बाबीला वनविभाग गांभीर्यांने घेत नसल्याने शिकाऱ्यांचे मनोबल चांगलेच उंचावले आहे. आजची घटना त्याचाच परिपाक असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. सदर बिबटे आणि त्यांचा बछडा हा आठ दिवसांपूर्वीच विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याची चर्चा असून या घटनेतील आरोपींची संख्या मोठी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेची चौकशीमध्ये वनविभाग किती यशस्वी होतो हे पाहणे योग्य ठरेल.
काल सकाळी शिवारात जाणाऱ्या लोकांना या ठिकाणी एक मादा बिबटासह अन्य दोन बिबट कुजलेल्या अवस्थेत मृत आढळून आल्याने याची चर्चा परिसरात वाऱ्यासारखी पसरली. याची कुणकुण लागताच देवरी वनविभाग खडबळून जागे होत शोध मोहीम हाती घेतली. या गुन्ह्यात सामील असल्याचे संशयामुळे मेहताखेडा आणि भोयरटोला येथील काही लोकांना ताब्यात घेत चौकशी सुरू असल्याची माहिती वनाधिकारी जी एस राठोड यांनी प्रसारमाध्यमाला दिली आहे.