घरफोडीच्या साधनासह लपून बसलेल्या आरोपीला गंंगाझरी पोलिसांनी केले जेरबंद

0
3

गोंंदिया: गंगाझरी पोलिसा ठाण्यांतर्गत येणाऱ्या सुखदेवटोली बस स्टॉप जवळ अंधारात लोखंडी सळई घेऊन २३ सप्टेंबरच्या पहाटे ४ वाजता लपून बसलेल्या एकाला गंगाझरी पोलिसांनी मोटारसायकलसह अटक केली.आरोपी हा गुन्हा करण्याच्या उद्देशाने रोडच्या कडेला अंधारात घरफोडीच्या साधनासह लपून बसलेला होता. त्याच्या जवळून चोरीची मोटर सायकल व मंदिराच्या दानपेटीतून चोरलेली रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. आशिक रेखलाल राऊत (१९) रा. गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गंगाझरी पोलीस गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा या उद्देशाने पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी रात्रीच्या वेळी सतर्कपणे गस्त करून गुन्हे करण्याच्या तयारीत असलेल्या इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पेट्रोलींग करतात. २३ सप्टेंबरच्या पहाटे ४ वाजता गंगाझरीचे पोलीस निरीक्षक महेश बनसोडे व कर्मचारी पेट्रोलिंग करीत असतानना सुखदेवटोली बस स्टॉप जवळ अंधारामध्ये रस्त्याच्या कडेला आरोपी आशिक रेखलाल राऊत (१९) हा मोटरसायकल एम एच ३५ एच २४४० संयशीतरित्या थांबलेला मिळून आला.

पोलिसांनी त्याला विचारपूस करून त्याला त्या ठिकाणी थांबण्याचे कारण विचारले असता, त्याला त्याचे नीट कारण सांगता आले नाही. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याचेकडे सखोल विचारपूस केली असता, ती मोटर सायकल त्याने रामनगर हद्दीतील कुडवा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील एका घरासमोरून चोरल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे १ हजार ७२ रुपये, एक स्क्रू ड्रायव्हर व लोखंडी सळई मिळून आली. रामनगर हद्दीतील कुडवा येथील गोंडीटोला रोडवरील शिवमंदिर मधील दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरल्याचे सांगितले. त्याच्याकडून मोटरसायकल व रोख रक्कम असा एकूण २१ हजार १२० रूपयाचा माल जप्त करण्यात आला. आरोपीवर गंगाझरी पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२,१२४, १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गंगाझरीचे ठाणेदार महेश बनसोडे, पोलीस हवालदार तुळशीदास पारधी, पोलीस नायक महेंद्र कटरे, पोलीस शिपाई प्रशांत गौतम यांनी केली आहे.

दोन जिल्ह्यात गुन्हे दाखल

गंगाझरी पोलिसांनी अटक केलेला आरोपी आशिक रेखलाल राऊत (१९) रा. गोंदिया याच्यावर गोंदिया व भंडारा या दोन जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी विरोधात यापूर्वी सुद्धा पोलीस ठाणे गोंदिया शहर, पोलीस ठाणे गोरेगाव व पोलीस ठाणे भंडारा या ठिकाणी मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.