गोंदिया, . कॅरिअर झोन ट्युशन क्लासेसमध्ये शिकणारे चार विद्यार्थी पांगोली नदीत पोहायला गेले. त्यातील एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज, मंगळवारी रेल्वे पुलाखाली दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. मृताचे नाव यशराज धीरेंद्रसिंह रघुवंशी (वय 17, रा. अवंती चौक गोंदिया) असे आहे.
गेल्या सहा ते सात दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नदी आणि नाल्यांतील पाण्याची पातळी देखील वाढली आहे. नदी आणि नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील कॅरिअर झोन येथे ट्युशन घेत असलेले चार विद्यार्थी आज, मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास पांगोली नदीच्या छोटा गोंदिया परिसरात असलेल्या रेल्वे पुलाखाली नदीच्या पात्रात उतरले. त्यातील यशराज धीरेंद्रसिंह रघुवंशी हा 17 वर्षीय मुलगा आपल्या मित्रांसह आंघोळ करत असताना तो खोल पाण्यात गेला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खावू लागला. त्याच्या मित्रांना देखील काय घडत आहे, याची कल्पना येण्याआधीच यशराज बुडाला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. तातडीने जिल्हा शोध व बचाव पथक घटनास्थळावर रवाना करण्यात आले. सायंकाळपर्यंत पथक शोधकार्य करत होते. मात्र त्याचा शोध अद्याप लागला नाही. या घटनेमुळे शोक व्यक्त करण्यात येत आहे.
महिनाभरापूर्वी तिघे बुडाले
शहरातील एका सुप्रसिद्ध ट्युशन इन्स्टिट्युटचे चार शिक्षक सुटीनिमित्त छत्तीसगड राज्यात सहलीला गेले होते. एका पाणी भरलेल्या खाणीत ते आंघोळ करण्याकरिता उतरले. एक जण मात्र बाहेरच राहिला. पाण्यात उतललेल्या तीनही शिक्षकांचा मृत्यू झाला होता. महिनाभरात ट्युशन क्लासेसमधील पाण्यात बुडून मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे.