लाच स्वीकारल्या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जेरबंद…

0
12
वाढदिवसाच्या शुभेच्छा

दिड लाखाची केली होती मागणी

रायगड लाच लुचपत विभागाच्या पथकाकडून करण्यात आली कारवाई

काही अधिकारी व कर्मचारी रडारवर असल्याचे बोलले जात आहे.

अशा पोलीसांमुळे पोलीस खात्याचे नाव होत आहे बदनाम..

सावंतवाडी:-१ लाखाची लाच स्वीकारल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रायगड लाच लुचपत विभागाच्या पथकाकडून करण्यात आली.

फ्लॅट विक्री संदर्भातील फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकलेल्या बिल्डरकडून तडजोड करण्यासाठी १ लाखाची लाच घेतल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरिक्षक सागर खंडागळे याला रायगड येथील लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले.ही कारवाई काल सायंकाळी ६ वाजून २२ मिनीटांच्या सुमारास चक्क सावंतवाडी पोलीस ठाण्यातच करण्यात आली असल्याने खळबळ उडाली आहे.याबाबतची तक्रार बिल्डर सिद्धांत परब यांनी केली होती.या प्रकरणी सूरज पाटील नामक एका पोलीस उप निरीक्षकावर तक्रार दाखल असून त्याला देखील ताब्यात घेण्यात येणार आहे.असे समजते.सदरचा अधिकारी हा व्हीआयपी दौऱ्यात स्कॉडवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सदरची कारवाई ठाणे लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे व उपअधिक्षक अनिल गेर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड लाचलूचपत विभागाचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जाधव,हवालदार महेश पाटील,कौस्तुभ मगर,विवेक खंडागळे,पोलिस नाईक,सचिन आटपाटकर आदींच्या पथकाने केली.

याबाबतची तक्रार बिल्डर सिद्धांत परब यांनी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात ८ ऑक्टोबर रोजी ठाणे लाचलूचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ठाणे लाच लुचपत विभागाचे पथक जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी दाखल झाले होते. ते संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या पाळतीवर होते. या संदर्भात संबंधित बिल्डरसोबत संशयित सागर खंडागळे व अन्य एका पोलीस उप निरीक्षकाच्या बैठकाही झाल्या. यात सिद्धांत परब यांचे सहकारी असलेल्या एका सैनिकावर असलेल्या गुन्हा दाखल असल्याने त्याबाबत तडजोड करण्यासाठी दीड लाखाची लाच मागितली होती.त्यानंतर संबंधित पथकाच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास बिल्डर सिद्धांत परब यांनी सावंतवाडी पोलीस ठाणे गाठले.यावेळी पोलीस ठाण्यातच कोठडीच्या समोर सदरची १ लाखाची रक्कम ताब्यात घेताना लाच लुचपत विभागाच्या पथकाने सागर खंडागळे याला रंगेहात ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत याबाबतची कारवाई सुरु होती. रात्री ८ च्या सुमारास सिंधुदुर्ग लाचलुचपत विभागाचे उप अधिक्षक अरुण पवार यांच्यासह पथक सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यांच्याच ताब्यात संशयित सागर खंडागळे याला ताब्यात देण्यात येणार आहे.संशयित सहायक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे ६ महिन्यापूर्वीच सावंतवाडी पोलिस ठाण्यात हजर झाले होते.तर उपनिरीक्षक सुरज पाटील सुमारे अडीज वर्षांपासून सावंतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास बिल्डर सिद्धांत परब हे सावंतवाडी पोलीस ठाण्यात आले.त्यांनी पोलीस ठाण्यातील कोठडीच्या परिसरात सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे याच्या हातात १ लाख रुपयांची रोख रक्कम दिली. याच वेळी पाठीमागून साध्या वेशात दाखल झालेल्या रायगड लाच लुचपत विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.यावेळी त्यांच्यात काही काळ झटापटही झाली.याच दरम्यान पोलीस ठाण्यात एका पती पत्नीतील भांडणाचे प्रकरण नोंद करण्याचे काम सुरु होते. याचवेळी पोलीस ठाण्याच्या बाहेर रायगड पासिंगची एक इन्होव्हा व एक ब्रेझा गाड्या दाखल झाल्या. मात्र, त्यातील अधिकारी साध्या वेशात असल्याने पोलीसांना पती पत्नी भांडण प्रकरणातील या व्यक्ती असाव्यात असा समज झाल्याने उपस्थित असलेल्या काही अधिकार्‍यांनीही त्या ठिकाणी धाव घेतली व सागर खंडागळे यांना सोडविण्याचा प्रयत्न केला. याच वेळी पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी आपले ओळखपत्र दाखवत कारवाई करीत असल्याचे स्पष्ट करताच सारे मागे हटले.

सावंतवाडी पोलीस विभागातील अलिकडच्या काळात झालेली लाच लूचपत विभागाची ही तिसरी कारवाई आहे. यापूर्वी सावंतवाडीचे तत्कालिन  पोलीस उपविभागीय अधिकारी विठ्ठल जाधव यांना १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. तर त्यानंतर सावंतवाडीतील एका राजकीय पुढार्‍याकडून लाच घेताना तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी ही कारवाई केली.